पनवेल : बातमीदार, वार्ताहर
आयुक्तांच्या आदेशाने लॉकडाऊन कालावधीत काही दुकाने विशिष्ट दिवशी उघडण्याची काही अटींवर परवानगी दिली आहे, परंतु याकडे दुर्लक्ष करून काही दुकानदार वैयक्तिक फायद्यासाठी कायद्याचा भंग करीत आहेत. ओरियन मॉलमध्ये दुकान सुरू करण्यास परवानगी नसताना बिग बझारमधील कापडाचे दुकान चालू शुक्रवारी (दि. 23) होते. त्यामुळे महापालिकेने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपायुक्त जमीर लेंगरेकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती डचे प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने बिग बझारमधील दुकान बंद करून त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता 1860च्या कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पनवेल महापालिका हद्दीत जर कोणी लॉकडाऊनच्या आदेशांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने दिला आहे.