प्रवाशांची तारेवरची कसरत
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाला मागील वर्षी पावसाच्या पाण्याने वेढा घातला होता. त्या वेळी मध्य रेल्वे प्रशासनाने पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे मार्गाखालून नाला बांधण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ खोदकाम करून ठेवले आणि नाला बनविला नाही. त्यामुळे शुक्रवार (दि. 8) सकाळपासून भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाला पावसाच्या पाण्याने वेढा घातला. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबद्दल प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील भिवपुरी रोड स्थानक परिसरात झालेल्या बांधकामांमुळे गेल्या काही वर्षापासून स्थानकाच्या आजूबाजूला पावसाचे पाणी साचत आहे. गतवर्षी दोन्ही मार्गावरील रेल्वेरूळ पाण्याखाली गेले होते. त्यावेळी बिल्डरने पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाला खोदून दिला आणि त्यानंतर स्थानिक लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेल्या पाण्याचा निचरा झाला होता. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत बाजूचा नैसर्गिक नाला मोठा करण्याचा निर्णय घेतला. मे महिन्यात या कामाला सुरुवात केली आणि केवळ खोदकाम केले.
शुक्रवारी भिवपुरी रोड स्थानकात डिकसळ गावाच्या बाजूला तब्बल तीन फूट पाणी साचून राहिले होते.स्थानकाबाहेर पडण्यासाठी प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून जावे लागत आहे. प्रवाशांच्या दुचाकीदेखील पाण्यात अडकून पडल्या होत्या. रेल्वेमार्गावरदेखील पाणी आले होते. त्यामुळे भिवपुरी रोड प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.