Monday , October 2 2023
Breaking News

आजही थांबत नाही आदिवासींचे स्थलांतर!

अलिबाग : प्रतिनिधी

कातकरी, ठाकूर हा आदिवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहात येत असला तरी आजही या समाजाला रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे. आपले मूळ गाव सोडून इतर गावात जावे लागत आहे. कोरोनामुळे या समाजाच्या समस्या वाढल्या आहेत.

आजही आदिवासी लोकांना रोजगारासाठी पाठीवर बिर्‍हाड घेऊन फिरावे लागते. डोंगर वस्तीवर राहणार्‍या या समाजातील लोकांना वाडी-वस्तीवर रोजगार मिळत नसल्याने त्यांना रोजगारासाठी आपली वाडी सोडून काही महिने बाहेर राहावे लागते.

सध्या अलिबाग तालुक्यातील रामराज तागवडीमधील आदिवासी ठाकूर कुटुंबातील बिर्‍हाडे सातीर्जे गावात झोपड्या बांधून राहत आहेत. आगरसुरेफाट्यावरून सातीर्जे गावात जाताना रस्त्यालगत शिवमंदिरासमोरील मोकळ्या जागेत,  झाडांच्या सावलीत बांधण्यात आलेल्या या झोपड्या चटकन लक्ष वेधून घेतात. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. जिथे बंद घरात ही थंडी जाणवते तिथे उघड्यावर ती अधिकच बोचते, मात्र हे आदिवासी बांधव थंडी आणि सापांची भीती न बाळगता आपल्या संपूर्ण परिवारासोबत बिनधास्त राहत आहेत.

रामराज डोंगर परिसरात तागवडी, होंडावाडी, सतवाडी, सागवाडी, बारशेत या आदिवासी वाड्या आहेत. तेथून हे आदिवासी आले आहेत. कोरोनाने मुलांचे शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. मुले शिक्षण घेत आहेत, पण शाळा बंद आणि कोरोनामुळे रोजगारही थांबला. वाडीवर रोजगार नसल्यामुळे अधिक प्रमाणावर आदिवासींनी स्थलांतर केले आहे. मिळेल ते काम करायचे, कोणी शेतीच्या कामाला, तर कोणी बिगारी कामाला जाऊन रोजगार मिळवतो. सर्वांनाच सारखा रोजगार मिळत नाही. असले काम तर जायचे नाहीतर घरात बसून दिवस काढायचा असे त्यांचे जीवन सुरू आहे.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply