अलिबाग : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक मंगळवार (दि.16)पासून कोकणच्या दौर्यावर आले आहे. या पथकाने पहिल्या दिवशी रायगड जिल्हातील वादळग्रस्त तालुक्यांना भेट दिली.
केंद्र शासनाच्या आंतर मंत्रालयीन पथकात सहसचिव (प्रशासन व सीबीटी) एनडीएमच रमेशकुमार गंटा (भाप्रसे), अर्थ मंत्रालयाचे (खर्च) सल्लागार आर. बी. कौल, ऊर्जा मंत्रालयाचे संचालक एलआरएल के. प्रसाद, ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव एस. एस. मोदी, कृषी मंत्रालयाचे संचालक आर. पी. सिंग, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे संचालक तुषार व्यास यांचा समावेश आहे.
केंद्रीय पथक सकाळी अलिबाग येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
बैठकीनंतर प्रत्यक्ष पाहणी दौरा सुरू झाला. अलिबाग तालुक्यातील नागाव येथे शाळेची इमारत तसेच समुद्रकिनारी झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर चौल येथे फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांची पथकाने भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी बागांची पाहणी करतेवेळी झालेले नुकसान तात्पुरते किंवा केवळ पिकांचे नसून पुढील 10 वर्षे तरी यातून उत्पन्न मिळणार नाही, ही बाब शेतकर्यांनी समिती सदस्यांच्या निदर्शनास आणून दिली.
Check Also
25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …