Breaking News

कर्नाळा बँकेचे व्यवहार आरबीआयने गोठवले

500 रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यास निर्बंध

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि त्यामुळे डबघाईला आलेल्या या बँकेचे व्यवहार आता येत्या सहा महिन्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने गोठवले आहेत. त्यामुळे कर्नाळा बँक आणि या बँकेचे चेअरमन असलेले शेकाप नेते, माजी आमदार विवेक पाटील, संचालक मंडळ तसेच शेकापच्या बड्या धेंडांनाही दणका बसला आहे. कर्नाळा बँकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने आरबीआयने पहिले पाऊल टाकल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होते.
आरबीआयने 15 जून 2020 रोजी एक दिशादर्शक आदेश काढला आहे. या आदेशानुसार बँक रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट 1949च्या कलम 35 ए आणि कलम 56च्या अन्वये सहा महिन्यांसाठी कर्नाळा बँकेच्या प्रशासकांना कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामध्ये कोणतेही नवे कर्ज देणे, कोणत्याही नव्या ठेवी स्वीकारणे, कर्जाचे नूतनीकरण करणे, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे तसेच कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण वा विक्री तसेच त्या दृष्टीने कोणतेही करार करणे या सर्व बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
या संदर्भात कोणत्याही प्रकारचे व्यवहार करावयाचे झाल्यास आरबीआयची लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बँकेचे बचत खाते, चालू खाते वा इतर कोणत्याही खात्यातून पाचशे (500) रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नसल्याचे बंधनही आरबीआयने घातले आहे. बँकेची आर्थिक स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. सहा महिन्यांनंतर बँकेची त्या त्या वेळची परिस्थिती पाहून या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही सुधारणा करावयाच्या की नाही अथवा ते अधिक कडक करायचे याबाबत आरबीआय निर्णय घेईल.

आरबीआयकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे कर्नाळा बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेचे चेअरमन विवेकानंद शंकर पाटील यांच्या पापाचा घडा आता भरत आला आहे. ते या संपूर्ण कारस्थानाला जबाबदार असल्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे सामान्य ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील.
-आमदार महेश बालदी, अध्यक्ष, कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply