
खोपोली ः प्रतिनिधी
नगरपालिका हद्दीतील श्रीरामनगर येथे ब्रह्मांडेश्वरी सोसायटी इमारतीमधील तळमजल्यावरील श्रद्धा संतोष लोखंडे या महिला पोलिसाच्या फ्लॅटला मंगळवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. परिसरातील रहिवाशांनी व अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझविली. आगीचे कारण अद्याप समजले नाही. श्रद्धा लोखंडे सकाळी अंबरनाथ येथे ड्युटीसाठी घरातून निघाल्या. त्या केळवली येथे पोहचल्या असतानाच शेजार्यांनी त्यांना त्यांच्या फ्लॅटला आग लागल्याचा भ्रमणध्वनी केला. त्या वेळी त्यांचे पती व मुले घरात नव्हती. ते खोपोलीत गेले होते असे स्थानिकांकडून समजते. इमारतीमधील व शेजारील रहिवाशांनी आग लागताच विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खोपोली अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, पण तोपर्यंत घरातील सर्व वस्तू जळून कोळसा झाला होता.