Breaking News

लपवालपवी कशासाठी?

देशात दुर्दैवाने महाराष्ट्रातच कोरोनाचा फैलाव सर्वाधिक होत असल्याचे चित्र एप्रिलपासून दिसत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रामाणिकपणे, नियोजनबद्ध रीतीने पावले उचलण्याऐवजी कोरोनाचे रुग्ण व मृतांच्या आकड्यांचे घोळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे हे आता पुरते उघड झाले आहे. कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे हा आकड्यांचा खेळ?

देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आणि अल्पकाळातच या महामारीचा सर्वाधिक वेगवान फैलाव महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत सुरू असल्याचे आकडेवारीवरून दिसू लागले. सुरुवातीला मुंबईतील यंत्रणेने आपण सर्वाधिक चाचण्या करीत असल्याचा दावा करीत त्यामुळे या महानगरात सर्वाधिक कोविड-19 रुग्ण दिसत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पण सातत्याने मुंबई आणि महाराष्ट्राचीच आकडेवारी देशाच्या कोरोना रुग्ण संख्येमध्ये सर्वाधिक भर घालत असल्याचे दिसत राहिले. एकीकडे आपल्या राज्यातील कोरोना रुग्णांचे आकडे हे अशातर्‍हेने भयावह रीतीने वाढत असताना रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी आकड्यांचा घोळ घातला जात आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट एप्रिलमध्येच सर्वप्रथम केला होता. त्यानंतर वेळोवेळी त्यांनी रुग्णसंख्येच्या नोंदींमध्ये हेतुपुरस्सर घोटाळा केला जात असल्याकडे लक्ष वेधले. आणि सोमवारी तर त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, मुंबईतील 950 मृत्यू कोरोना मृत्यू म्हणून न दाखवल्याबद्दल तसेच यासंदर्भातील आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नसल्याबद्दल पत्र लिहून सार्‍यांचेच लक्ष या गैरप्रकाराकडे वेधले. मुंबईतील सुमारे 451 प्रकरणांमध्ये ते मृत्यू कोरोनामुळे होऊनही मुंबई महापालिकेच्या डेथ ऑडिट कमिटीने ती प्रकरणे नॉन-कोविड केल्याचा धक्कादायक प्रकार फडणवीस यांच्या पत्रामुळे समोर आला. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर सरकारनेही आकड्यांच्या पडताळणी व समायोजनातून मुंबईत आणखी 862 प्रकरणे व अन्य जिल्हा व महापालिका क्षेत्रांमध्ये 466 प्रकरणे आढळल्याची कबुली आता दिली आहे. असे एकूण 1328 मृत्यू हे आता अधिकचे कोरोना मृत्यू म्हणून नोंदले जाणार आहेत. या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेले तीन महिने ही आकडेवारी लपवणार्‍यांवर काय कारवाई करणार हे आता सांगितले गेले पाहिजे अशी रास्त मागणी आता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून अखेर हे सत्य लोकांसमोर आले आहे. पण मुळात आकड्यांची ही लपवाछपवी का झाली, कुणाच्या दबावावरून यंत्रणेने हे काम केले हे समोर यायलाच हवे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, ही फडणवीस यांची मागणी अतिशय योग्य अशीच आहे. अशातर्‍हेने आकडे लपवून वा आकड्यांमध्ये फेरफार करून मुंबई व महाराष्ट्रातील जनतेच्या जिवाशी खेळ का केला जात आहे. सत्य दडवून ठेवून जनतेला अंधारात ठेवले गेले तर गाफिल जनता कोरोनाच्या जाळ्यात आणखीनच अडकणार नाही का? काय आहे राज्यातील खरी परिस्थिती? गरज असलेल्या प्रत्येकाला कोरोना चाचणी करणे सहज शक्य होते आहे का? ज्या-ज्या रुग्णाला आवश्यकता आहे त्या-त्या प्रमाणे रुग्णवाहिका, बेड उपलब्ध होत आहे का? या सार्‍या सुविधांची वाढत्या कोरोना फैलावाच्या प्रमाणात वाढती उपलब्धता निर्माण करण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे, या सार्‍याच प्रश्नांची उत्तरे आता सरकारने द्यावीत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply