Breaking News

उलटा ‘चोर’ ‘चौकीदार’ को डांटे!

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी मुंबईच्या नगरसेवकांना पूर्वी नगरपिते म्हणत असताना ‘नगरसेवक’ संबोधण्याची सूचना केली. शहरातील लोकप्रतिनिधी हा नागरिकांचा सेवक असतो म्हणून प्रभागातून निवडून आलेले हे नगरसेवक संबोधण्यात येऊ लागले. हाच धागा थेट भारताच्या पंतप्रधानपदापर्यंत नरेंद्र मोदी यांनी नेला आणि मी पंतप्रधान, प्रधानमंत्री नव्हे, तर ‘प्रधानसेवक’ आहे, असे विनम्रपणे नमूद केले, पण एकदा डोळ्यावर पिवळ्या रंगाचा चष्मा घातला की सर्व पिवळेच दिसणार. तसेच भारतातल्या विरोधी पक्षांचे झाले. विशेषत: काँग्रेस पक्षाचे झाले असल्याचे दिसून येत आहे.

ऐतिहासिक वारसा मिरवणार्‍या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांबद्दल काय बोलणार. या राष्ट्रीय अध्यक्षांपासून जाणत्या राजांपर्यंत सार्‍यांना मोदी विरोधाची कावीळ झाली आहे आणि हे सारे जण सस्वरित असल्यासारखे वागू लागले आहेत. आता त्यात राजीव राहुलच्या सल्लागार पित्रोदांपर्यंत भर पडली आहे. अभ्यास नसला, माहिती नसली आणि समयसूचकतेचा समंजसपणाचा, समन्वयाचा अभाव असला की वरच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून खालच्या प्रवक्त्यांपर्यंत वाटेल ते बोलत असतात आणि मग ते आपले हसे करून घेत असतात.

एकदा एका प्रदेशाध्यक्षाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती-पुण्यतिथी याची माहिती नसताना आपल्या अकलेचे तारे तोडण्याचे वृत्त आले होते. बरं! लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे अध्यक्ष होते याचीही माहिती यांना आहे का? जिवंत, हयात असलेल्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्याला श्रद्धांजली वाहण्याचा प्रताप केला इतकेच काय तर कुख्यात ओसामा बिन लादेनला ‘ओसामाजी’ म्हणून संबोधून आपली संस्कृती दाखवून दिली असल्याचेही सांगण्यात येते. तद्वतच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मसूदजी म्हणायला धजावले. राफेल घोटाळ्याच्या नावाने बोंबाबोंब करताना आपण कुणाच्या विरोधात बोलतो याचेही भान राहिले नाही. ज्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन ज्यांनी भारताला संविधान दिले त्या संविधानाच्या माध्यमातून घटनात्मक पद असलेल्या पंतप्रधानपदाची शपथ घेऊन भारताचे राज्यशकट हाकणार्‍या नरेंद्र मोदी यांच्यावर ज्या खालच्या पातळीवर एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष टीका करतो तेव्हा त्या राष्ट्रीय अध्यक्षाची कीव करावीशी वाटते. आपण एखादी टीका करताना आपल्या देशाची प्रतिमा जगात मलीन होईल, आपल्या देशाचे शत्रू आपल्या देशाबद्दल विखारीपणाने बोलताना आपल्याच वक्तव्याचा आधार घेतील याचे साधे भान या राष्ट्रीय अध्यक्षाला असू नये?

पुलवामाच्या घटनेनंतर बालाकोटवर आपल्या वायूसेनेने हल्ला चढवला आणि अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मसूद अझरचे भाऊ आणि मेहुणा यांना यमसदनी धाडले, त्या वीर विंग कमांडर अभिनंदन वर्धमानने बहादुरीचे दर्शन सार्‍या जगाला घडवले. या पाकिस्तानला धडा शिकविणार्‍या भारतीय लष्कराचे कौतुक तर सोडून द्या, पण एअर स्ट्राईकचे पुरावे मागताय? आपल्या लष्कर प्रमुखाने सणसणीत उत्तर देताना ‘हल्ला करताना आम्ही आमचे काम करतो, मुडदे मोजण्याचे काम आमचे नव्हे’ अशी चपराक लगावली, पण सतत चपराक खाणार्‍या आणि कोणताही विधिनिषेध न बाळगणार्‍यांना त्याचे काय?

भारतीय लष्कर देशाचे संरक्षण करीत असते. डोळ्यांत तेल घालून सीमेवर जवान रक्षण करीत असतात म्हणून आपण शांतपणे झोप घेऊ शकतो, पण या लष्करावरच शंका घेण्याचे महापाप विरोधक करताहेत? अरे, कुठे फेडाल ही पापं? नरेंद्र मोदी यांनी आपण देशाच्या 125/130 कोटी जनतेचे चौकीदार असून डोळ्यांत तेल घालून आपण देशातल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करतो, असे म्हटले आणि विरोधकांची कोल्हेकुई सुरू झाली. राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्व जाहीर सभांमधून ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा देऊ लागले. हे बोलताना आपण देशातील कोट्यवधी चौकीदार, सुरक्षा रक्षकांचा अपमान करीत आहोत हेही यांच्या ध्यानीमनी नाही? प्रत्येक सहकारी, गृहनिर्माण संस्था, बँका अशा सर्वत्र व्यवस्थापनांकडे सुरक्षा रक्षक असतो. त्यालाच ‘चौकीदार’ म्हणतात. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला देशाचा ‘चौकीदार’ म्हणून संबोधणे हा देशातल्या समस्त सुरक्षा रक्षकांचा सन्मान, बहुमानच केला आहे. या नरेंद्र मोदी यांना ज्यांनी जगात सर्वत्र भारताची प्रतिमा उंचावली असताना ‘चौकीदार चोर है’ अशा पद्धतीने टीका करून काँग्रेसवाल्यांनी या देशातल्या तमाम सुरक्षा रक्षकांचा अपमानच केला आहे. त्यामुळे देशातले सुरक्षा रक्षक काँग्रेसवर अत्यंत संतप्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सुमारे 25 लाख सुरक्षा रक्षक, चौकीदार यांच्याशी एकाच वेळी संवाद साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मैं भी चौकीदार या मोहिमेंतर्गत या 25 लाख चौकीदारांशी संवाद साधताना काँग्रेसवाल्यांच्या चुकीबद्दल स्वत: पंतप्रधानांनी या सुरक्षा रक्षकांची माफी मागितली.

जगभरातली सर्व भाषेतील लोकांना आता चौकीदार या शब्दाचा अर्थ माहीत झाला आहे. त्यांनी मनापासून हा शब्द स्वीकारला आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्हा लोकांचीच चर्चा देशात सुरू आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून नमूद केले. दूरदर्शन, खासगी दूरचित्रवाहिन्या, वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमे, भारत देश असो वा परदेशात सर्वत्र प्रत्येक भारतीय आपल्याला मैं भी चौकीदार असे म्हणून अभिमानाने हा शब्द मिरवत आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिकविणारा शिक्षक हा शाळेचा चौकीदार, दवाखान्यात रुग्णांना तपासून त्यांना बरे करणारा डॉक्टर हा आरोग्य सेवेचा चौकीदार, घरातला कुटुंबप्रमुख हा घरचा चौकीदार अशा पद्धतीने या देशातला प्रत्येक जणच चौकीदाराच्या भूमिकेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 लाख सुरक्षा रक्षक, चौकीदारांशी संवाद साधताना प्रत्येकाला इतका अभिमान वाटत आणि जाणवत होता की सर्वांमधली उच्चनीचतेची दरी संपुष्टात आली होती. भेदभाव संपून सारे एकत्रच असल्याची भावना वाढीला लागली होती. या वेळी पंतप्रधानांनी चांगल्या गोष्टी सांगताना विरोधकांचा सणसणीत समाचारही घेतला आणि एअर स्ट्राईकचे पुरावे मागणारे हे पाकिस्तानची भाषा बोलताहेत, त्यांना हे माहीत नाही की यांची देशाचे लष्कर, पंतप्रधानांवरची टीका हा पाकिस्तानात सर्व वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमांत महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. टीका जरूर करा, पण ती टीका विधायक असली पाहिजे.

माझ्यावर टीका करा, शिव्या द्या, माझ्या व्यक्तिगत टीकेचा मी अवश्य स्वीकार करीन, पण देशाच्या एकात्मतेवरचा हल्ला, देशाच्या सुरक्षेशी तडजोड कदापि स्वीकारणार नाही, खपवून घेणार नाही. आप मुझे गाली जरूर दो, हरेक गाली का मैं मेरा गहना समझके स्वीकार करूंगा। मला दिलेली प्रत्येक शिवी ही माझा अलंकार म्हणून समजावे, असे जेव्हा नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा त्यांची आध्यात्मिक बैठक किती पक्की आहे याचेच प्रत्यंतर आपल्याला येते. आपल्या ज्ञानेश्वर, तुकारामांपासूनच्या संत परंपरेतून आपल्याला हेच दिसून आले आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले, पण चौकीदार चोर है म्हणणार्‍यांनी स्वत:कडे ढुंकून पाहण्याची गरज आहे. 15 लाख मिले क्यां? असं विचारणार्‍या राहुल गांधी-प्रियंका गांधींपासून तळागाळातल्या काँग्रेसी नेत्यांना याची माहिती आहे का? विदेशी बँकांतला काळा पैसा भारताकडे आला की 15-15 लाख प्रत्येकाला मिळतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 सालीच ठणकावून सांगितले होते आणि काळा पैसा परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली, पण अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणार्‍यांना काय सांगणार? डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून भ्रष्टाचार्‍यांचा बुरखा टराटरा फाडण्यात आला असून या प्रकरणात जामिनावर असलेल्यांनी ‘चौकीदार चोर है’ म्हणणे म्हणजे ‘उलटा चोर चौकीदार को डांटे’ असेच म्हणावे लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनी ‘चौकीदार चोर है’ म्हणणे म्हणजे स्वत:चं ठेवावं झाकून आणि दुसर्‍याचं पाहावं वाकून अशीच गत म्हणावी लागेल. संपूर्ण यंत्रणा, पक्ष एका कुटुंबासाठी वेठीस धरणार्‍यांनी नरेंद्र मोदींवर टीका करणे हे हास्यास्पदच आहे.

ज्या नरेंद्र मोदी यांनी आपला स्वत:चा प्रपंच नवी दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी थाटला नाही. मातोश्री ‘हिराबेन’सुद्धा स्वतंत्र राहतात आणि जो देशातल्या 130 कोटी नागरिकांच्या कुटुंबाला सुखसमृद्धी देण्यासाठी 20-20 तास अहोरात्र झटतो. एअर स्ट्राईकच्या वेळी पहाटे 2.30, 3.30, 5.30 वाजता डोळ्यांत तेल घालून लष्कर प्रमुख, संरक्षण मंत्री, गृहमंत्र्यांशी, सुरक्षा सल्लागारांशी देशाच्या सुरक्षित भवितव्याबाबत चर्चा करतो त्याच्यावर टीका करून ‘चौकीदार चोर है’ असे म्हणणार्‍यांना ईश्वरसुद्धा माफ करणार नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीत 2014चा विक्रम मोडून पुन्हा देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी करणार ही खात्री पटल्यानेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास शतगुणीत होत असल्याने आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची युती अभेद्य झाल्याने महाराष्ट्रातील आणि देशातील विरोधी पक्षातल्या दिग्गजांना युतीचे दरवाजे दिसले आणि नि:संकोचपणे या दिग्गजांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. मतदान, मतमोजणी आणि निकाल आता केवळ उपचार म्हणून शिल्लक राहिल्याचे जाणत्या राजांपासून मायावतींपर्यंत सार्‍यांनाच

पटले आहे.

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

संगीतकार राजेश रोशन 50 वर्षांचे करियर : एक रास्ता है जिंदगी…

यश चोप्रा निर्मित व रमेश तलवार दिग्दर्शित दुसरा आदमी (1977) या चित्रपटातील चल कहीं दूर …

Leave a Reply