Breaking News

शिखंडी/किन्नर

महाभारतात पांडवांनी विजय मिळवलेल्या युध्दात अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे भीष्माचा वध. हा वध जरी अर्जुनाच्या बाणाने झाला तरी हा विजय शिखंडीशिवाय शक्य झाला नसता. एवढा शिखंडीचा प्रभाव होता. शिखंडी या विषयवार एक नाटक आले आहे. महाभारतातील शिखंडीच्या महती व कार्यावर प्रकाश टाकला असला तरी आजच्या नाटककाराने या विषयाकडे आजच्या सध्याच्या दृष्टिकोनातून या नाटकाला कलाटणी दिली आहे. तृतीयपंथीच्या जीवनावर उद्भवलेल्या प्रसंगाची मांडणी करण्यात आली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती चारचौघांसारखी दिसत नसते, तेव्हा त्या व्यक्तीला मानसिक रोषाला सामोरे जावे लागते. तृतीयपंथीचे लहानपण कसे जाते, त्याला जीवन जगताना कोणते प्रसंग येतात, याचा विचार करण्यात आला आहे. शिखंडी व द्रौपदी बाल्यावस्थेत लहान मुलांत खेळत असताना सतत वेगळेपणाची जाणीव होते. काही मुले खेळायला घेत नाहीत, तर मुलीही खेळायला घेत नसल्याने शिखंडीची घुसमट होते. त्याच्या मनात सतत भावना व्यक्त होते की मी कोण आहे, मुलगा आहे की मुलगी, की  वेगळेच, मधलेच काहीतरी. पुढे नाटकाचा प्रवास सुरू होतो.

या   नाटकातील शिखंडीचा जीवनप्रवास महाभारतातील असला तरी त्यावेळीही तृतीयपंथीयांच्या वाट्याला संघर्ष आला होता. तो संघर्ष सध्याच्या युगात काळात तसाच असल्याचा अनुभव वारंवार येत असतो.अशा व्यक्तीला सळो की पळो करून सोडले जाते. त्या व्यक्तीला समाजमान्य साच्यात बसण्यास भाग पाडले जाते. किन्नर, छक्का, हिजडा अथवा तृतीयपंथी अशा नावाने या व्यक्तीला संबोधले जाते. इस्लाममध्ये हराम नावाने उल्लेख केला जातो. अशा व्यक्तीची शारीरिकदृष्ट्या पुरुष म्हणून ओळख असून वेशभूषा, लैंगिक भूमिका स्त्रीप्रमाणे असते. शरीर पुरुषाचे व मानसिकता स्त्रीची-पुरुषाची, यामुळे तृतीयपंथी गोंधळलेले असतात. वागणे, बोलणे, हावभाव स्त्रियांप्रमाणे असतात. ड्रेस कोणता घालावा याबद्दल साशंकता असली तरी बहुतांशपणे महिलांचा ड्रेस परिधान केला जातो. एकटेपणा वाटू नये तसेच सुरक्षिततेसाठी समूहाने राहतात.

समाजात तृतीयपंथींविषयी तिरस्कार, चेष्टेची व भीतीची भावना प्रचलित असल्याने व शिक्षण नसल्याने रोजगाराची कोणतीच संधी वाट्याला येत नाही. तृतीयपंथी व्यक्तीला कुटुंबातून बाहेर टाकल्याने शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, व्यावसायिक अकुशलता, समाजाचा बघण्याचा दूषित दृष्टिकोन, भेदभाव या कारणाने नेहमीच अत्यंत हलाखीचे जीवन जगत असतात. सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्थानक, रेल्वेगाडीत, बसस्थानक, मंदिर, रस्त्यावरील सिग्नल येथे अश्लील हावभाव करीत भीक मागण्याचे काम करतात. यांना लहान मुलांविषयी खूपच आस्था व प्रेम असते. बालकाच्या जन्मानंतर त्याला हातात घेत नाचून गाऊन आशीर्वाद देत पैशांची मागणी करतात, तर विवाहप्रसंगी नववधू-वराला आशीर्वाद देत पैशांची मागणी केली जाते. होळी, दिवाळी, दसरा अशा धार्मिक सणात  जास्त देणगीची मागणीही केली जाते. कित्येक वेळेला लहानमोठा व्यवसाय केला तरी समाजाची  बघण्याची मानसिकता तसेच वाकडी  नजर  यामुळे तृतीयपंथी व्यवसायात यशस्वी होत नाहीत. उलट त्यांच्याकडे वेगळ्या सुखाची मागणी केली जाते, अशा तक्रारी

तृतीयपंथीयांमधून केल्या जातात.

शासकीय अर्जांमध्ये, दाखल्यांमध्ये स्त्री-पुरुष असा रकाना ठेवला असतो. या ठिकाणी आम्ही काय लिहायचे अशी संभ्रमावस्था निर्माण होते. भारत देशात लोकशाही मार्गाचा अवलंब  केला आहे. जात, धर्मानुसार आरक्षण, सामाजिक सुरक्षितता दिली जाते, मात्र

लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्याक असलेल्यांना  वार्‍यावर सोडण्यात आले आहे. आरक्षण व अधिकार सोयीसुविधा तसेच शिक्षण,  रोजगारात विशेष हक्क बहाल करण्यात अजूनही कोणी पुढे आले नाही. महाराष्ट्रात सन 2013मध्ये तृतीयपंथीयांचा महिला धोरणात समावेश करण्यात आला एवढीच जमेची बाजू, मात्र मानवी हक्काची जपणूक होण्यासाठी आरोग्य, कौशल्य विकास, निवारा, सामाजिक सुरक्षितता, पुरस्कार, कायद्याचे संरक्षण, स्वायत्तता, प्रतिबंधात्मक उपाय, बचत गट यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी तृतीयपंथी कल्याणकारी बोर्डाची राज्यस्तरीय व जिल्हानिहाय स्थापना करीत अंमलबजावणी करण्याची जबाबदारी टाकण्याची घोषणा केली, मात्र ती हवेतच तरंगत आहे.

घोषणेची कार्यवाही व्हावी अशी मानसिकता अद्याप कोणाच्यातही तयार झाली नाही. देवाला सोडलेल्या तृतीयपंथीयांची संख्या किती, त्यांचा सामाजिक व आर्थिक दर्जा काय, ते सध्या काय करतात, त्यांच्या भावनिकता, मानसिकता इतर गरजा काय याविषयी सखोल संशोधन अद्याप झाले नाही, मात्र सर्वसामान्य जगात त्यांना अवहेलना, कुचेष्टा व टाळण्याचा नेहमीच प्रयत्न केला जात असतो.

प्रसारमाध्यमेही तृतीयपंथीयांच्या समस्यांवर विशेष प्रकाशझोत टाकण्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर तृतीयपंथीयांच्या मूलभूत गरजा, त्यांच्या हक्काचे संरक्षण करणारा तसेच कुचेष्टेपासून मुक्त करणारा एकही कायदा नाही. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.

आम्हाला सगळे तुच्छतेने का बघतात, असा सवाल एका तृतीयपंथीयाने केला आहे. भारतीय नौदलातून एका कर्मचार्‍याला अवमानकारक पद्धतीने काढून टाकण्यात आले. लिंग बदलून पुरुषाची स्त्री झाली असल्याचा ठपका. कोची मेट्रोतल्या 11 तृतीयपंथी कर्मचार्‍यांनी निराशेने नोकरी सोडली, तर प्रगतीच्या गप्पा मारणार्‍या अमेरिकेने तृतीयपंथीयांना सैन्यदलात सामावून घेणार नसल्याचा फतवा काढला आहे, मात्र उदरनिर्वाहासाठी कोर्टाच्या आवारात भीक मागणारे जोयीता मोंडल यांनी अपमानास्पद वागणुकीचा बदला घेण्यासाठी शिक्षण पूर्ण करून न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. सोलापुरातील तरंगफळ गावाच्या सरपंचपदी ज्ञानू उर्फ माऊली शंकर कांबळे यांची निवड झाली. समाजसेविका गणेश उर्फ गौरी सावंत यांची ओळख महाराष्ट्राला आहे. राजेराजवाड्यांच्या काळात मोठमोठी पदे मिळवून दिली जात असत. काही राजे स्त्रियांच्या महाली संरक्षक म्हणून नेमणूक करण्यासाठी लहानपणापासूनच काही मुलांना मुद्दामहून पुरुषत्वापासून दूर करीत असत. तृतीयपंथीयांची संस्कृती सर्वच धर्मांत आहे.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply