Breaking News

शेतकर्यांच्या स्वाभिमानासाठी भाजप सरकार कटिबद्ध; दलालांची मक्तेदारी मोडीत काढणार; पंतप्रधानांची घोषणा

नाशिक ः प्रतिनिधी

भाजपा जर पुन्हा सत्तेत आली, तर महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांना किसान सन्मान योजनेचा फायदा दिला जाईल. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली किमान पाच एकर जमिनीची अट रद्द केली जाईल. शेतकर्‍यांच्या स्वाभिमानासाठी भाजप कटिबद्ध  आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील पिंपळगाव येथील सभेत केली. महायुतीचे नाशिक आणि दिंडोरीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल येईल, त्यावेळी जर मोदी सरकार सत्तेत आले, तर त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांना किसान सन्मान योजनेची मदत दिली जाईल. त्यासाठी किमान पाच एकर जमिनीचा नियम हटवला जाईल. कांदा उत्पादकांसाठी स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट व्यवस्था निर्माण केली जाईल. शेतमालाचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होते, मात्र या समस्येचे खरे कारण ग्राहक नाही, तर दलाल आहेत. आमच्या सरकारने या दलालांविरोधातच लढाई छेडली आहे. या दलालांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. त्यामुळे यापुढे आता शेतकर्‍यांच्या मर्जीशिवाय कोणीही काहीही करू शकणार नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत भाजपाने सरस कामगिरी केली आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे मी काहीही बोललो की आता काँग्रेसला शॉक बसतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने दोन पातळ्यांवर सरकार चालवले. सामान्य माणसाचा स्तर उंचवावा आणि एकविसाव्या शतकात पायाभूत सुविधांचा विकास करीत भारताचा स्तर वाढावा यासाठी आम्ही काम केले. एका बाजूला देशातील प्रत्येक गरीब कुटुंबासाठी प्रत्येक वर्षाला पाच लाख रुपयांचा मोफत इलाज निश्चित केला, तर दुसरीकडे प्रत्येक तीन लोकसभा मतदारसंघांदरम्यान एक वैद्यकीय महाविद्यालय आणि ग्रामीण भागात दीड लाखांहून अधिक आधुनिक आरोग्य केंद्रे बनवत आहोत. 2014पूर्वी भारतात बॉम्बस्फोट होत होते. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार केवळ शोकसभाच घेत होते, तर जगात पाकिस्तानच्या नावाने गळा काढण्याचे काम करीत होते, मात्र आता प्रत्येक दहशतवाद्याला माहिती आहे की जर देशात कुठेही बॉम्बस्फोट केला, तर इकडे मोदी आहे. मोदी त्यांना पाताळातूनही शोधून काढत शिक्षा देईल. त्यांना संपवून टाकेल, असा इशारा मोदी यांनी या वेळी दिला. आज केवळ सरकारच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाची छाती फुलून गेली आहे. जगभरात भारत आणि भारतीयांचा जयजयकार केवळ तुमच्या मतांमुळेच होत आहे. ही आपल्या मताची ताकद आहे. आज भारत आपल्यासमोरील आव्हानांचा कणखरपणे सामना करीत आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी अभिमानाने सांगितले. रोजगाराच्या प्रश्नावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नाशिक, जालना आणि वर्ध्यात मल्टी लॉजिस्टीक पार्क बनवले जाणार आहे. यामुळे व्यापाराला चालना मिळेल. यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. समाजातील प्रत्येक घटकासाठी आम्ही काही ना काही केले आहे. आदिवासी तरुणांसाठी एकलव्य शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यांच्या खेळातील सहभागासाठी, हस्तकलेसाठी तसेच वन्यसंपत्तीचा योग्य वापर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply