नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन वाढवताना नागरिकांच्या समस्या विचारात न घेण्यात आल्याबाबत भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी लॉकडाऊन वाढवताना नागरिकांच्या समस्या लक्षात घ्याव्या, अशी मागणी केली आहे. या संदर्भात पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे.
नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत चाललेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावज्ञवर प्रभावी नियंत्रण आणण्याकरीता महानगरपालिका प्रशासनाकडून 3 ते 14 जुलै या दरम्यान लॉकडाऊनचा अवलंब करण्यात आला. त्यानंतर या लॉकडाऊनची मुदत वाढवून 15 ते 24 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा घेतलेला निर्णय स्तुत्य व प्रभावकारक आहे त्याबद्दल कोणतेही दुमत नाही परंतु हा कालावधी वाढवताना नागरिकांनी पुरेसा अन्नसाठा घरामध्ये केलेला आहे किंवा नाही याबाबतचा विचार होणे अत्यंत आवश्यक होते. त्याकरीता नागरिकांना थोडा कालावधी देणे अत्यंत आवश्यक होते. जेणेकरुन त्यांनी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक साहित्याचा साठा करुन घेतला असता व नागरिकांची गैरसोय टाळणे शक्य झाले असते.
तसेच लॉकडाऊन वाढवत असताना लोकप्रतिनिधी (नगरसेवकांना) विश्वासात घेणे आवश्यक होते कारण लोकप्रतिनिधींना जनतेने निवडुन दिलेले आहे. व नागरिक आपआपल्या समस्या लोकप्रतिनीधींकडे मांडतात. कालावधी वाढवणेबाबत लोकप्रतिनिधींना काहीही माहित नव्हते. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यापुर्वी नागरिकांना आवश्यक साहित्याचा साठा करण्यासाठी काही कालावधी देण्यात यावा, अशी मागणी केली केली आहे.