जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांचे स्पष्टीकरण
पनवेल : प्रतिनिधी : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संबंधित एका वृत्तपत्रात बुधवारी (दि. 13) प्रसिद्ध झालेली ‘पनवेल व उरणची राजकीय समीकरणे बदलणार; ठाकूर कुटुंबीयांच्या भूमिकेकडे लक्ष’ ही बातमी कलोलकल्पित तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या कुटुंबीयांबाबत पूर्णपणे दिशाभूल करणारी आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसताना, युती अभेद्य असताना, तसेच आमदार प्रशांत ठाकूर देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना बसविण्यासाठी सज्ज असताना व त्यादृष्टीने अहोरात्र मेहनत करीत असताना त्यांच्याबाबत अशा पद्धतीने बातम्या पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे पत्रकारितेतील सभ्यतेला धरून नाही, असे भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी म्हटले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आदी कामांसाठी अनेक लोक वेळोवेळी येत असतात. त्यात राजकीय पक्षांचीही मंडळी असतात. त्या सर्वांना ठाकूर पिता-पुत्र यथाशक्ती व उदारपणे मदत करीत असतात. त्यांचे दातृत्व व सामाजिक कर्तृत्व रायगडातच नव्हे; तर महाराष्ट्रात सर्वश्रृत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांना पक्षाने त्यांच्या कार्याच्या जोरावर प्रथम रायगड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तसेच जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विश्वासाने सिडकोच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी देऊन त्यांच्या कामाची पोचपावती दिली आहे, हे सर्वांना ठावूक आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर हे महाराष्ट्राचे लाडके व कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी आहेत आणि हे दोघेही पिता-पुत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सतत कार्यरत व प्रयत्नशील असून, त्यांच्या विश्वासार्हतेवर संशय घेणारी बातमी प्रसिद्ध करणे अत्यंत हास्यास्पद आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बातमीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांची शरद पवार यांच्या कुटुंबीयांबरोबर जवळीक असल्याचा जो उल्लेख केला आहे, ती जवळीक राजकीय नसून रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कामांसंदर्भातील आहे. रयत शिक्षण संस्था ही संपूर्ण भारतातील व महाराष्ट्रातील नावाजलेली शिक्षण संस्था असून, अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मान्यवर ज्येष्ठ नेतेमंडळी या शिक्षण संस्थेत पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामध्ये माजी खासदार रामशेठ ठाकूर हे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत व संस्थेला वेळोवेळी भरीव आर्थिक योगदान देत असतात. हे पाहता ही जवळीक राजकीय नाही हे सिद्ध होते. त्यामुळे अशा प्रकारचे खोडसाळ वृत्त अशा नामांकित दैनिकात छापून येणे योग्य नाही. पत्रकारितेचा संदर्भ लक्षात घेता केवळ एकांगी वृत्त प्रसिद्ध करणे चुकीचे आहे. दुसरी बाजू समजून घेऊन ती प्रसिद्धीस देणे हे बातमीदाराचे कर्तव्य मानले जाते. तेच या वृत्तपत्राकडून अपेक्षित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्य व भूमिका समस्त जनतेला माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत गैरसमज पसरवू नयेत, असेही शेवटी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी नमूद केले आहे.