कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदार
कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथून मोटरसायकल, रिक्षा चोरणार्या चोरास कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले आहे. त्याने तीन लाख 70 हजार रुपयांची पाच वाहने चोरली होती. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या चोर्यांना प्रतिबंध करण्याकरिता रविवारी (दि. 21) कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथक कर्जत शहरात पेट्रोलिंग करीत होते. या वेळी किरवली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ पेट्रोलिंग करताना एक संशयित ऑटोरिक्षा (क्र. एमएच-05 डीक्यू 9644) ही नेरळ बाजूकडून कर्जतकडे येत असल्याचे पथकास दिसले. त्या वेळी सदर ऑटो रिक्षाचालकास थांबवून त्याच्याकडे ऑटोरिक्षाच्या कागदपत्रांची व वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी केली असता सदर इसमाकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आढळली नाहीत. ही ऑटोरिक्षा त्याच्या कर्जत येथील मित्राची असल्याचे सांगून तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. या वेळी पथकाने कार इन्फर्मेशन अॅपद्वारे ऑटो रिक्षाची माहिती काढली असता ही ऑटोरिक्षा सुधीर मधुकर गांगुर्डे यांच्या नावे असल्याचे आढळले. ही ऑटोरिक्षा चोरीची असल्याबाबत पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी सदर इसमास त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने कर्जत तालुक्यातील तमनाथ येथे राहत असून माझे नाव संदेश शिवाजी बोराडे (18) असे सांगितले. पोलिसांनी ऑटोरिक्षा पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता ही ऑटोरिक्षा काही दिवसांपूर्वी त्याने कल्याणहून चोरी करून आणल्याचे कबूल केले. याबाबत त्या इसमाविरुद्ध सरकारतर्फे पोलीस अंमलदार अश्रुबा बेंद्रे यांनी खबर देऊन कर्जत पोलीस ठाणे येथे फौजदारी प्रक्रिया संहिता 41 (1) (ड) म. पो. का. क. 124प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्या इसमास न्यायालयाच्या परवानगीने अटक करून अधिक चौकशी केली असता आरोपीने मागील तीन महिन्यांपासून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथून दोन बजाज कंपनीच्या ऑटोरिक्षा, दोन बुलेट मोटरसायकल, एक हिरो होंडा फॅशन मोटरसायकल अशी तीन लाख 70 हजार रुपयांची एकूण पाच वाहने चोरल्याचे तपासात कबूल केले. ही वाहने पोलिसांनी आरोपीकडून जप्त करून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर पोलीस ठाण्याशी संपर्क करून माहिती दिली. रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर, निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील उपनिरीक्षक सचिन गावडे, अंमलदार सुभाष पाटील, भूषण चौधरी, अश्रुबा बेंद्रे, आकाश राठोड, सुहास काबुगडे यांनी ही कारवाई केली.