
पोलादपूर ः प्रतिनिधी
तालुक्यात मागील दोन दिवसांत प्राप्त कोविड टेस्टच्या अहवालानुसार सहा कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पोलादपूर शहरातील तीन रुग्णांचा समावेश असून त्यापैकी दोन रुग्ण पोलीस कर्मचारी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याखेरीज एका मृत कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांकडून कोविड टेस्ट करण्यास नकार देण्यात आल्याने यंत्रणा हतबल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावात एक रुग्ण 20 जुलैला कोविड पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी घेतलेल्या 14 स्वॅबपैकी 21 जुलैला आलेल्या अहवालात पोलादपूर शहरातील तीन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळले. यात प्रभातनगर पश्चिम, आंबेडकरनगर आणि नाना स्मृती अपार्टमेंट या लोकवस्त्यांतील प्रत्येकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. आंबेडकरनगर व नाना स्मृती अपार्टमेंटमधील रुग्ण पोलीस खात्यात सेवेला आहेत. अन्य दोघांपैकी एक माटवण, तर दुसरा काटेतळी येथील रुग्ण आहे. पोलादपूर तालुक्यात आतापर्यंत पोलादपूर प्रभातनगर, काटेतळी, माटवण, तुर्भे बुद्रुक आणि देवपूर येथील पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पोलादपूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 59वर पोहचल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.
मुरूडमध्ये कोरोनाबाधितांची शंभरी पार
मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी शंभरी पार केली आहे. बुधवारी (दि. 22) तालुक्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. अजून काही जणांची स्वॅब चाचणी घेतली असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. मुरूड शहरातील दरबार रोडजवळील 74 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 101वर गेली असून 70 रुग्ण बरे होऊन होम क्वारंटाइन झाले, तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 23 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार गमन गावित यांनी दिली.नागरिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत असल्यामुळेच आज कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. लवकरच मुरूड तालुका कोरोनामुक्त होईल. तरी संयम राखून आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. सुरक्षित राहून आरोग्याची काळजी घ्यावी. अत्यावश्यक वेळी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. परिसरात स्वच्छता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार गमन गावित यांनी नागरिकांना केले आहे.
नागोठण्यात दोन रुग्ण वाढले
नागोठणे ः शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये नियमित वाढच होत असून नव्याने दोन बाधित रुग्ण आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 22पर्यंत पोहचली आहे. यातील प्रभूआळी गांधी चौकात राहणारी व्यक्ती सरकारी सेवेत आहे, तर शहरात राहणारी दुसरी पॉझिटिव्ह रुग्ण महिला असल्याचे सांगण्यात आले.