Breaking News

औषधांबाबत घ्यावी दक्षता

आरोग्य प्रहर

मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे आजार अनेकदा एकत्रितरीत्या आढळतात. या आजारांवरील औषधे देताना डॉक्टरांना सावधगिरी बाळगावी लागते. औषधांचे दुष्परिणाम, औषधा-औषधांमधील प्रक्रिया, औषधे आणि आजारांमधील प्रक्रिया व औषधांच्या डोसांचे प्रमाण या सर्व बाबी लक्षात घेऊन औषधे देणे गरजेचे असते. तरीही योग्य औषधे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागतात. त्याचा सर्वाधिक फटका वृद्धांना बसतो. रुग्णाला एवढी औषधे देण्याची खरंच गरज आहे का, असा प्रश्न डॉक्टरांनी स्वत:ला विचारला तर अनेक वृद्धांची काही औषधे कमी होऊ शकतात.

अनेक औषधे घ्यायची असल्याने काही वेळा नेमकी कोणती औषधे केव्हा, किती प्रमाणात घ्यायची याबाबत गोंधळ होतो. काही वेळा रुग्ण घेत असलेल्या इतर औषधांविषयी माहिती नसल्याने डॉक्टरांकडून औषधे लिहिताना त्रुटी राहतात. दोन वेगवेगळे डॉक्टर वेगळ्या कंपनीचे मात्र एकाच प्रकारचे औषध लिहून देऊ शकतात. त्यामुळे रुग्णाला अधिक औषधे घ्यावी लागतात.

काही वेळा दुसरी औषधे आधीच्या औषधांच्या उपचारांवर परिणाम करतात. उदा. कॅल्शियम आणि लोहाच्या गोळ्या एकत्र दिल्या जात नाहीत. औषधांचा इतर आजारांवरही परिणाम होतो. उदा. वेदनाशामक गोळ्या घेतल्याने रक्तदाब वाढून मूत्रपिंडाची कार्यक्षमता घटते. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना ही औषधे दिली जात नाहीत.

एकाच वेळी पाचपेक्षा अधिक औषधे घेण्याच्या पद्धतीला बहुऔषधे पद्धती असे म्हटले जाते. दहापेक्षा अधिक औषधे घेणे खरेतर जोखमीचे असते. वेगवेगळ्या आजारांवरची औषधे घेणार्‍या रुग्णांत हे सर्रास आढळते. स्थूलता, उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडांची ठिसूळता असे आजार त्याचप्रमाणे वेदना, झोप कमी होणे, दीर्घकाळ चालणारे उपचार, वयासोबत दिसणारी लक्षणे अशा अनेक कारणांमुळे औषधांची संख्या वाढते. त्यामुळे 40 टक्क्यांहून जास्त वृद्धांत अनेक औषधे देण्याची वेळ येते. बहुऔषधे अनेकदा गरजेची असतात, मात्र त्यांचा वापर नीट केला नाही तर उपयोगितेपेक्षा ती दुरुपयोगी ठरतात. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांना दिलेली औषधे आणि त्याचे परिणाम यावर सातत्याने लक्ष ठेवावे लागते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply