राज्य शासनाचेदुर्लक्ष
खोपोली : प्रतिनिधी
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने स्थानिक स्तरावर उपचार आणि अलगीकरण करण्यासाठी खोपोली नगरपालिकेकडून दोन ठिकाणी 40 व 20 बेड्सच्या कोरोना केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली, मात्र या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीत. जिल्हा परिषद किंवा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक डॉक्टरांची पूर्तता व्हावी म्हणून नगरपालिकेकडून जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला असूनही मागणी पूर्ण झाली नाही.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खोपोलीत दोन ठिकाणी कोरोना केअर सेंटर्स निर्माण करण्यात आली. सुरुवातीला आरोग्य विभागाकडून दोन डॉक्टर्स पाठविण्यात आले होते, मात्र जेमतेम 12 दिवस सेवा दिल्यावर हे दोन्ही डॉक्टर्स येथून गेले ते अद्याप आलेच नाहीत. दरम्यान, तात्पुरती सोय म्हणून नगरपालिका रुग्णालयातील व मानधनावरील डॉक्टरांनी हे कोरोना केअर सेंटर चालविले. वर्तमान स्थितीत याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
खोपोली आणि परिसरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता येथील कोरोना केअर सेंटरसाठी किमान चार डॉक्टर्सची पूर्ण वेळेसाठी आवश्यकता आहे. यासाठी नगरपालिकेकडून जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही. अशा स्थितीत खोपोलीला जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पालकमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांनी वार्यावर सोडले आहे की काय, अशी भावना येथील सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे.