पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर शहरातील श्रीकाळ भैरवनाथ देवस्थान उत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही खाजगी आणि सार्वजनिक दहीहंडया फोडण्याचे एक नियमबध्द नियोजन करण्यात आले असून दरवर्षी या नियोजनानुसारच दहीहंडी फोडण्याची संधी शहरातील 12 नगरांना देण्यात येत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानचे सेवेकरी स्व. सुंदरशेठ पालकर यांचे नातू शैलेश वसंत पालकर यांनी पंचांच्या साक्षीने दहीहंडी फोडली.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दहीहंडी उत्सवाला मर्यादा आल्याने श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानचे सेवेकरी स्व. सुंदरशेठ पालकर यांचे नातू शैलेश वसंत पालकर यांच्याहस्ते यंदा देवस्थानची हंडी देवस्थानचे अध्यक्ष बाबूराव महाडीक, सचिव विजय पवार, खजिनदार शंकर दरेकर, ज्येष्ठ सेवेकरी रामभाऊ भूतकर तसेच पुजारी संतोष गुरव यांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्यात आली.
पोलादपूर शहरात महत्व ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ देवस्थान उत्सव मंडळातर्फे ही हंडी कोणत्या नगरातील गोविंदांनी फोडायची याबाबत आधीच नियोजन केले जाते. तसेच फोडण्यात आलेल्या प्रत्येक दहीहंडी सोबत बक्षिसाची रक्कम श्री काळभैरवनाथ देवस्थानाच्या पंचकमिटीकडे जमा करण्यात येते.