पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मंगळवारी (दि.18) मतदान घेण्यात आले. दुपारी अडीच वाजेपर्यंत एकूण 57 टक्के मतदान झाले होते. चार जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. चारही मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. काही मतदार आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन मतदानासाठी आले होते. मतदात्यांचा उत्साह चांगला होता. मंगळवारी मतदान झालेल्या 2, 5, 8 व 14 या चार प्रभागांचा आणि 21 डिसेंबरला मतदान घेतलेल्या 13 प्रभागांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि. 19) लागणार आहे.
माणगावात सकाळपासून मतदारांच्या रांगा
माणगाव : येथील नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांसाठी मंगळवार (दि. 18) सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रवर रांगा लागल्या होत्या. माणगाव नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या 17 जागांपैकी 13 जागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले आहे. उर्वरित वार्ड क्र.6, 8, 14 व 17 मधील चार जागांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. त्यासाठी सकाळी 10 ते 11 या वेळेत मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दुपारी मतदारांची गर्दी कमी झाली. चारही वार्डातील मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माणगावात कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले.
पोलादपूरमध्ये 12 उमेदवारांचे भवितव्य ‘इव्हीएम’मध्ये बंद
पोलादपूर : येथील नगरपंचायतीच्या दुसर्या टप्प्यातील उर्वरित चार प्रभागांतील एकूण 12 उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी (दि. 18) इव्हिएम यंत्रामध्ये बंद झाले. या वेळी सर्वच मतदान केंद्रांमध्ये कोविड नियमावलीचे पालन करण्यात आले. पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रभाग 2 मध्ये भाजपचे संभाजी माने, शिवसेनेचे मनोज प्रजापती आणि काँग्रेसचे कल्पेश मोहिते या उमेदवारांत लढत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या पोलादपूर विद्यामंदिरामधील केंद्रात दुपारी दीड वाजेपर्यंत 380 पैकी 140 मतदारांनी मतदान केले होते. प्रभाग 8 मध्ये भाजपच्या रचना धुमाळ, शिवसेनेच्या सोनाली गायकवाड आणि काँग्रेसच्या अनिता जांभळेकर यांच्या तिरंगी लढत आहे. शंकरराव महाडीक न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मतदान केंद्र असून, 348 मतदार आहेत. प्रभाग 10 मध्ये 287 मतदार असून, तेथे भाजपचे प्रतिक सुर्वे, शिवसेनेचे प्रसाद इंगवले आणि काँग्रेसच्या शुभांगी चव्हाण यांच्यात लढत होत आहे. शहरातील प्राथमिक शाळा नं.1 मध्ये मतदान केंद्र आहे. प्रभाग 14 मध्ये भाजपच्या अंकिता जांभळेकर, शिवसेनेच्या प्राची सुतार आणि काँग्रेसच्या प्रतिक्षा भूतकर यांच्यात लढत आहे. या प्रभागाचे मतदान केंद्र शहरातील प्राथमिक शाळा नं.1 मध्ये आहे. चारही प्रभागांमध्ये दुपारी दीडनंतर सरासरी 45 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.