रोहा, धाटाव : प्रतिनिधी
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार व व्यवस्थापन समितीकडून कामगारांना कामावरून तडकाफडकी काढून टाकणे, कोरोना काळात त्रास देणे यांसह होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात भाजप बुधवारी (दि. 19) सकाळी 11 वाजता एल. पी. कंपनीच्या गेटसमोर प्रतीकात्मक आंदोलन करणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर करणार असून, या वेळी आमदार रविशेठ पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे, अशी माहिती भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.कंपनीतील कायमस्वरूपी कामगार दिनेश चंद्रकांत भोकटे (रा. धाटाव) याला काही दिवसांपूर्वी तकलादू कारणे दाखवून अचानक कामावरून काढून टाकण्यात आले व पोस्ट चेक देऊन कंपनीत न येण्यास सांगितले गेले. कोणतेही कारण नसताना कामावरून काढल्यामुळे व जुनी युनियन साथ देत नसल्याने त्याने भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांची भेट घेतली. अॅड. मोहिते यांनी रोहा येथील शासकीय विश्रामगृहात येऊन भोकटे याला परत कामावर घेण्यासाठी कंपनी मालकाच्या भेटीची वेळ मागितली, मात्र कंपनीच्या मालकाशी कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ न शकल्याने 19 तारखेला मोर्चा काढण्याचे ठरले आहे. कामगाराची पिळवणूक कोणी करीत असेल आणि कंपनीच्या मालकावर कुणाचा वरदहस्त असेल तर ते असू द्या, पण या आंदोलनातून सगळे प्रकरण बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा गर्भित इशारा या वेळी अॅड. मोहिते यांनी दिला.एल. पी. कंपनीच्या गेटसमोरील आंदोलन हे प्रतीकात्मक स्वरूपात असून, ज्या ज्या ठिकाणी कामगारांवर कंपनी व्यवस्थापन अन्याय करीत आहे त्या कारखानदारांना व व्यवस्थापनाला या आंदोलनाच्या माध्यामातून हा इशारा आहे तसेच आंदोलनावेळी कंपनीसमोर भारतीय मजदूर संघप्रणित कामगार युनियनच्या नामफलकाचे अनावरण करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, रोह्याचे माजी नगराध्यक्ष संजय कोनकर, भाजप तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, शहर अध्यक्ष वसंत शेलार, रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य राजेश डाके, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नरेश कोकरे आदी पदाधिकारीही पत्रकार परिषदेस उपस्थित होते.