नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात दररोज 50 ते 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढल्याचे समोर आले आहे. देशात सध्या तीन कोटींपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत. भारताने एका दिवसात नऊ लाख 99 हजार 864 कोरोना चाचण्या करण्याचा विक्रम केला आहे. ही आतापर्यंतची देशातील सर्वांत जास्त संख्या आहे.देशात आतापर्यंत तीन कोटी नऊ लाख 41 हजार 264 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक दिवसाला सरासरी पाच लाख चाचण्या होत होत्या. आता तिसर्या आठवड्यात हीच संख्या दुप्पट झाली आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी भारतात पीसीआर (पॉलीमेरास चेन रिअॅक्शन) आणि रॅपिड अँटीजन (रॅपिड टेस्ट)चा वापर केला जातो. दरम्यान, देशात मंगळवारी (दि. 18) संपलेल्या 24 तासांमध्ये 55 हजार 79 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, 876 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची संख्या 27 लाख दोन हजार 743वर पोहचली आहे. देशात सध्या सहा लाख 73 हजार 166 अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत 19 लाख 77 हजार 780 जणांनी कोरोनावर मात केली असून, मृतांची संख्या 51 हजार 797 इतकी झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली.