Breaking News

नागोठण्यात विनामास्क फिरणार्यांवर कारवाईचा बडगा

नागोठणे : प्रतिनिधी

कोरोनाशी आमचे काही देणेघेणे लागत नाही अशा अविर्भावात शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच बाजारपेठ भागात मास्क न लावता फिरणार्‍या व्यक्तींवर ग्रामपंचायत कर्मचारी आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी (दि. 31) दंडात्मक कारवाई केली. ग्रामपंचायत तसेच पोलीस यांनी उघडलेल्या या मोहिमेमुळे शहरात समाधान व्यक्त केले जात आहे.

गतवर्षी कोरोना महामारीच्या काळात शहरात 255 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती व त्यापैकी सात रुग्णांना मृत्यूने गाठले होते. तेव्हा ग्रामपंचायत आणि पोलिसांनी केलेल्या अथक परिश्रमाने त्याला काहीसा अटकाव आला होता. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात काहींनी अट्टाहासाने मास्क लावणे टाळले होते व काही दुकानदार मागील दाराने ग्राहकांना सामान देण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. या वर्षी पुन्हा एकदा कोरोनाचे संकट उभे राहिले आहे.

नागोठणे शहरात या महिन्यात कोरोनाचे 13 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी तीन रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. नागरिकांनी मास्क लावणे ही काळाची गरज बनली आहे. आता जर मास्क लावले नाही, तर रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी व्यक्त केली.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी  ग्रामपंचायतीकडून विशेष मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील दुकाने तसेच हॉटेल आणि इतर व्यवसाय रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. नियमांचे पालन न केल्यास पोलिसांच्या सहकार्यातून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करतानाच ‘नागरिकांनी सहकार्य करावे‘ असे आवाहन सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी केले आहे.

 रात्री आठनंतर नागरिकांनी घरातून बाहेर पडणे टाळावे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

-दादासाहेब घुटुकडे, पोलीस निरीक्षक, नागोठणे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply