Breaking News

आला उन्हाळा, तब्ब्येत सांभाळा! वाढत्या तापमानात आजार बळावण्याची शक्यता

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

मार्च महिन्याच्या अखेरीला तापमान 40 डिग्रीच्या आसपास पोहोचले असून, या तापमानात चाळीसहुन अधिक प्रकारचे आजार बळावण्याची शक्यता वाढण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

तापमान वाढीमुळे शरीरातील पाणी कमी होते व आपणास तहान जास्त लागते. कामावर जाणार्‍या, तसेच ऑफिसच्या बाहेर कामे करणारे अनेक नागरिक, फेरीवाले, टेम्पो व रिक्षा टॅक्सी चालविणारे अनेकजण उन्हाळ्याच्या कालावधीत रस्त्यावर उपलब्ध असलेल्या फेरीवाल्यांकडील लिंबू सरबत, इतर फळांचे ज्यूस व शीतपेये विकत घेतात व पोटाच्या आजाराला निमंत्रण देतात. कुर्ला रेल्वेस्थानकात लिंबू सरबत बनविण्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर बाहेरील खाद्यपदार्थ, ज्यूस, सरबत व शीतपेयांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे संचालक डॉ व्रजेश शहा सांगतात, मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत पश्चिम उपनगरातील नागरिकांच्या पोटांच्या विकारात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ होते. उष्णता दिवसेंदिवस वाढत असून, लोकांना डिहायड्रेशनची समस्या, घसा कोरडा पडणे, मळमळ होणे, डायरिया, अपचन, असे आजार होऊ शकतात. आपल्या शरीरातही विशिष्ट प्रकारचे जंतू असतात. त्यांना संधिसाधू जंतू म्हणता येईल. अनेकदा घशात किंवा पोटामध्ये आतड्यात हे जंतू असतात. संधी मिळाल्यावर हे जंतू डोके वर काढतात. अतिश्रम, उन्हात अधिक वेळ फिरणे, अस्वच्छ अन्नपदार्थ खाणे, अशुद्ध पाणी पिणे आदी अनेक कारणांचा हे संधिसाधू जंतू फायदा घेतात आणि जुलाबाला व पोटातील समस्यांना आयतेच निमंत्रण मिळते. सध्या तापमानात झालेल्या वाढीमुळे सतत घाम येतो. त्यातच खाद्यपदार्थ तयार होत असलेल्या भट्टीशेजारी काम करणार्‍या आचार्‍यांची स्थिती अधिक वाईट असते त्यांना येणार्‍या सततच्या घामामुळे जीवाणूंचा संसंर्ग  वाढण्याचा धोका असतो  अन्न शिजवताना, वाढताना हातमोजे (ग्लोव्हज) घालणे फार महत्त्वाचे आहे. डोसा, पावभाजी, चहा असे पदार्थ गरम असल्याने त्यातून  संसर्ग कमी होतो, परंतु  सॅण्डविच, भेळपुरी-शेवपुरी, चायनीज, फ्रँकीज अशा पदार्थासाठी कांदे, टोमॅटो कोथींबीर, तसेच ज्यूस बनविण्यासाठी लागणारी फळे खूप आधीपासून चिरलेले असण्याची शक्यता असल्याने त्यातून ई-कोलाय, कॉलिफॉर्म, स्टॅफिलोकोकस ऑरिअस अशा हगवण व जुलाबाला कारणीभूत ठरणार्‍या जिवाणूंचा संसर्ग होत असतो. सहज उपलब्ध होणारी रस्त्यावरील लिंबूपाणी, ताक, फळांचे ज्यूस, कोल्ड्रिंक आणि इतर ड्रिंक्ससुद्धा पोटांच्या विकाराला कारणीभूत ठरत आहेत. उन्हाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता कमी होते व कोरडेपणा वाढतो. त्यामुळे आपल्या शरीरातून घाम येण्याचे प्रमाण वाढते व शरीरातील पाणी पातळी कमी होते. पाण्याचा समतोल ठेवण्याची जबाबदारी किडनीवर असल्याने त्याचा विपरित परिणाम सर्वसाधारण किडनीवर होत असतो. मार्च ते मे  महिन्याच्या अखेरीपर्यंत मुतखड्याच्या पेशंटमध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढ होते, अशी माहिती नवी मुंबईतील नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमधील किडनी विकार तज्ञ डॉ. जितेंद्र खांडगे यांनी दिली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply