आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे आभार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या हद्दीतील सिडको वसाहतींमधील सर्व्हिस चार्जेस (सेवा शुल्क) 1 नोव्हेंबर 2022पासून आकारणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत करीत भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको आणि विशेषत्वाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
पनवेल महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सिडको महामंडळातर्फे पनवेल महापालिका क्षेत्रातील सेवा शुल्काची आकारणी 1 नोव्हेंबर 2022पासून बंद करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, पनवेल महापालिकेची स्थापना ही या परिसराला चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी झालेली आहे. त्या दिशेने महापालिका पाऊल टाकत असताना एकाच वेळेला महापालिकेचा कर आणि सिडकोचे सेवा शुल्क हे दोन्ही देणे नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यामुळे याबाबत महापालिकेने शासनाकडे केलेल्या विनंतीचा स्वीकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्यामुळे हा निर्णय नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरला आहे. म्हणून मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणार्या कालावधीत या सगळ्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोकडून भरीव निधी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी त्यांना या निमित्ताने विनंतीदेखील करतो, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले.