Breaking News

राजिपच्या 109 शाळांची पडझड

अलिबाग : प्रतिनिधी

जुलै व ऑगस्ट महिन्यात  झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) 109 शाळांची पडझड झाली आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी 52 लाख रुपये इतका निधी आवश्यक आहे. स्वयंपाकगृहांच्या दुरुस्तीसाठी 59 लाख 35 हजार रुपयांची गरज आहे. शाळा व स्वयंपाकगृह यांच्या दुरुस्तीसाठी एकूण चार कोटी 11 लाख 70 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जिल्ह्यात वादळी वार्‍यासह अतिवृष्टी झाली. त्यामुळे काही शाळांच्या भिंती कोसळल्या आहेत, तर काहींची छपरे उडाली आहेत. काही शाळा तर जमीनदोस्त झाल्या आहेत. मंदिरे, समाज मंदिर किंवा खाजगी इमारतींमध्ये शाळा भरविल्या जात आहेत. शाळांसाठी असलेल्या स्वयंपाकगृहांचीदेखील या अतिवृष्टीत पडझड झालेली आहे. जवळपास 186 शेडची अवस्था बिकट झाली आहेे. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राजिपच्या 109 शाळांची पडझड झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सुधागडमधील आपटवणे, माणगाव तालुक्यातील वारक आदिवासीवाडी, पोलादपूरमधील चांदके, महाडमधील कसबेशिवथर आणि श्रीवर्धनमधील आदगाव येथील प्राथमिक शाळांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने आठ कोटी रुपये मंजूर केले आहेत, परंतु नादुरुस्त शाळांची यादी अद्याप शिक्षण विभागाने सादर न केल्याने हा निधी वर्ग करण्यात आला नसल्याचे नियोजन विभागाकडून सांगण्यात आले. शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने प्राधान्यक्रमाने यादी बनवली होती, परंतु या यादीचे पुढे काय झाले याचा कुणालाच पत्ता नाही.

शाळांच्या या दुरवस्थेला जिल्हा परिषदेतील सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारीच जबाबदार आहेत. मुख्यालयाच्या इमारतीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, परंतु शिक्षणासारख्या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते,  आसा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी केला.

शाळा नादुरुस्त झाल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. ज्या शाळांची पडझड झाली आहे त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव लवकरच मागवण्यात येतील, तसेच शाळांच्या नवीन इमारतींसाठी शासनाकडून निधी मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

-नरेश पाटील, शिक्षण सभापती राजिप

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply