Breaking News

शिक्षक सहकारी बँकेचे अकाऊंट हॅक

नागपूर ः प्रतिनिधी

शिक्षक सहकारी बँकेचे अकाऊंट हॅक करून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने सुटीच्या दिवशी 30 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. ही रक्कम दिल्ली भोपाळसह विविध शहरांतील वेगवेगळ्या बँक खात्यांत वळती करण्यात आली आहे. सतर्क बँक प्रशासनाने वेळीच आवश्यक उपाययोजना केल्याने सायबर टोळीचा डाव उधळला गेला.

19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने बँकेचे व्यवहार बंद होते. ही संधी साधून सायबर गुन्हेगारांनी सकाळी 9.30च्या सुमारास बँकेचे अकाऊंट हॅक करून 30 लाख 13 हजार 170 रुपये नेटबँकिंगच्या माध्यमातून ट्रान्सफर करून घेतले. ही रक्कम आरोपी असरीफ खान याच्या नवी दिल्लीतील साऊथ इंडियन बँकेच्या खाते क्रमांक 022105300024352 मध्ये, रजनी शर्मा भोपाळच्या इंडसन बँकेतील खाते क्रमांक 158359820258मध्ये, ए. जी. प्लास्टिक इंडस्ट्रीज दिल्लीच्या खाते क्रमांक 9160200 40518631मध्ये, शाईन छाबरा, नवी दिल्लीच्या युनियन बँकेच्या खाते क्रमांक 5428020 130003412मध्ये, वरुण गुप्ता नवी दिल्लीच्या खाते क्रमांक 4078000 100288062मध्ये आणि विजय सोना पुणे याच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खाते क्रमांक 7212452559मध्ये वळते करण्यात आले. त्यातील 5 लाख 2100 रुपये आरोपींनी लगोलग काढून घेतले.

-सतर्कतेमुळे वाचली रक्कम नेटबँकिंगचा व्यवहार झाल्याचे काही तासांतच बँक प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे बँकेच्या अधिकारी पदाधिकार्‍यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना केल्या. पोलिसांच्या सायबर शाखेत तातडीने संपर्क करून संबंधित बँकेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात आला. त्यामुळे उपरोक्त आरोपींचे नमूद खाते तातडीने फ्रीज करण्यात आले. परिणामी बँकेचे 25 लाख 11 हजार 70 रुपये वाचले. या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर सायबर शाखेच्या अधिकार्‍यांनी बँकेचे महाव्यवस्थापक विनोद लोहकर यांची तक्रार गणेशपेठ ठाण्यात वर्ग केली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सहाय्यक निरीक्षक नानवे यांनी लोहकर यांच्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध कलम 420, 34 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम 66 (ड)अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply