नवी मुंबई : प्रतिनिधी
झुक झुक आगीन गाडी, पळती गाडी पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या! या बालगीताचा विसर आता पडला आहे. काळाच्या ओघात आणि इंटरनेटच्या जमान्यात मामाचे गाव हरवले आहे.
शाळेला उन्हाळ्याची सुटी लागताच बच्चे कंपनी मनात बेत रचायची, ते मामाच्या गावाला जाऊन धम्माल करण्याची, मौज, मजा, मस्ती, खेळ आणि फक्त खेळच. पण सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे यंदाही राज्य शासनाने कोरोना संसर्ग पाहता ताळेबंदी जाहीर केली आहे. जिल्हा बंदी घातल्याने दोन उन्हाळे बच्चेकंपनीला मामाच्या गावाला जाता आले नाही. बच्चे कंपनींनाही मामाच्या गावाला जाता येत नसल्याने त्यांच्यातील उत्साह कमी झाला आहे, मात्र मागील वर्षभरापासून कोरोनामुळे यावर निर्बंध आले आहेत. जिल्हांतर्गंत प्रवास करायचा म्हटले तरी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. कोरोनामुळे वर्षभरापासून बच्चेकंपनीला मोबाइलच्या माध्यमातून आजी आजोबा, मामा मामी व मावशी काका यांची खुशाली विचारावी लागत आहे. त्यामुळे आता कोरोना केव्हा संपेल, याची सर्वच वाट पाहत आहेत.
सध्या इंटरनेटच्या युगात मामाचा गाव परका झाला आहे. त्याची जागा आता फेसबुक, व्हॅटसअॅप आणि व्हीडीओ थ्रीडी गेमने घेतली आहे. कोरोनामुळे ऑनलाइन अभ्यासक्रम सक्तीचा केल्याने अनेकांच्या परीक्षादेखील ऑनलाइन पद्धतीने झाल्या, तर काहींना सरळसरळ परीक्षा न देताच पुढच्या वर्गात प्रवेश दिला गेला. ऑनलाइन अभ्यासामुळे मुलांना मोबाइलच्या स्क्रीनची जास्त सवय लागल्याने आताही मुले तासन्तास मोबाइल हाताळताना दिसत आहेत. कोरोना मुळे उद्याने बंद त्यामुळे खेळाचे वांदे झालेत, तर दुसरीकडे कोणाची तिसरी लाट येणार असून ती लहान मुलांना घातक असल्याने पालकांनी खबरदारी म्हणून मुलांना घरातच खेळण्याची सक्ती केल्याने मुलांना दिवसभर काय करायचे हा प्रश्न सतावत असल्याने मुले आपसूकच मोबाइलच्या व इंटरनेटच्या जाळ्यात ओढली जात आहेत. कोरोनामुळे मामाच्या गावाला ही जात न आल्याने मुले हिरमुसली आहेत. मे महिना अर्ध्यावर आला तरी मुलांना मामाच्या गावाला जात येत नाही.
एकेकाळी उन्हाळ्याची सुटी म्हटले की ग्रामीण व शहरी भागातली मुले मामाच्या गावाला जाण्यासाठी आतुर असायचे. तेथे गेल्यावर भरपुर खेळ खेळायचे, पोहण्यास शिकायचे, तासन्तास विहीरीत डुंबायची, मौजमस्ती करायची. तसेच आजी-आजोबा, मामा आपल्या नातवंडांचे, भाच्याचे कौतुक करायचे. मामाही आपल्या लाडक्या भाच्यांचे सर्व लाड पुरवायचे. त्यामुळे लहान मुले सर्व नातेवाइकांना ओळखायचे. दोन्ही घरचे आजी, आजोबा, मामा-मामी, काका-काकी, आत्या, मावशी कुटुंबातील इतर भावंड या सर्वांचा सहवास लाभायचा आता हे सर्व हरवले असून कोरोना कधी संपेल याची ते वाट पाहत आहेत.