Breaking News

मुख्य सचिव मदान यांनी स्वीकारला पदभार

मुंबई ः प्रतिनिधी

राज्याचे नवे मुख्य सचिव उरविंदर पाल सिंग मदान यांनी काल सकाळी अकराच्या सुमारास पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली. वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही मदान यांच्याकडे देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी काल पदभार स्वीकारल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव राजीव निवतकर यांनीही मदान यांचे स्वागत केले. या वेळी गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता तसेच मुख्य सचिव कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. मदान हे भारतीय प्रशासन सेवेच्या 1983च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. मे 2018पासून ते वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. मदान हे मूळचे पंजाबमधील चंदीगड येथील आहेत. त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1959 रोजी झाला. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मदान यांचे वडील बँकेत नोकरीला होते. वाणिज्य आणि विधी शाखेचे पदवीधर असलेल्या मदान यांनी यूकेमध्ये विकास व प्रकल्प नियोजन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मुंबईतील विविध विकास प्रकल्प, मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला अंतिम रूप देण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात झाले आहे. नांदेडमधील देगलूर उपविभागात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून मदान यांची सर्वप्रथम नियुक्ती झाली. त्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी, औरंगाबाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुंबई झोपडपट्टी नियंत्रक, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त, नांदेडचे जिल्हाधिकारी, केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागात उपसचिव, एमएमआरडीएमध्ये प्रकल्प संचालक (एमयूटीपी), म्हाडाचे उपाध्यक्ष, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आदी विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply