Breaking News

कोरोना लस येण्याआधी जगात 20 लाख मृत्यू होऊ शकतात

‘डब्ल्यूएचओ’कडून भीती व्यक्त

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
कोरोना या महामारीशी अवघे जग सामना करीत असून, कोविड-19वर लस शोधण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत, मात्र कोरोनाचा प्रतिबंध करणारी यशस्वी लस येण्याआधी जगभरात 20 लाख मृत्यू होऊ शकतात, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) व्यक्त केली आहे. डब्ल्यूओच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख माईक रेयान यांनी ही शक्यता बोलून दाखवली आहे.
कोरोना व्हायरसची लागण होऊन मागील नऊ महिन्यांमध्ये 9.93 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. येत्या काळात लस येण्याआधी ही संख्या दुप्पट होईल, म्हणजेच प्रभावी लस येण्याआधी 20 लाख मृत्यू होऊ शकतात, असे रेयान यांनी म्हटले आहे.
कोरोना संसर्गाने आजवर अमेरिकेत दोन लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात ही संख्या 93 हजारांहून अधिक आहे. ब्राझिलमध्ये 40 हजारांपेक्षा जास्त, तर रशियात 20 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्याच्या घडीला जगभरात कोरोनाची बाधा झालेले रुग्ण तीन कोटी 20 लाखांपेक्षा जास्त आहेत.  लॉकडाऊनची बंधने शिथील झाल्यानंतर लोकांनी घरांमध्ये ज्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली त्यामुळेही संक्रमण वाढले, असे रेयान यांनी नमूद केले आहे.
‘सिरम-ऑक्सफर्ड’च्या लसीचा केईएम रुग्णालयात तिघांवर प्रयोग
मुंबई : सिरम व ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूटने विकसित केलेली कोरोनावरील लस शनिवारी (दि. 26) मुंबईतील केईएम रुग्णालयात तीन स्वयंसेवकांना टोचण्यात आली. संपूर्ण भारतात निवडक 10 केंद्रात 1600 स्वयंसेवकांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे.
सिरम-ऑक्सफर्ड संस्थेने चाचणीचे पहिले दोन टप्पे पार केल्यानंतर मानवी चाचणीसाठी त्यांना ‘आयसीएमआर’ने परवानगी दिली होती. केईएम रुग्णालयात शनिवारी सकाळी तीन स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली. दुपारपर्यंत या तिघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. या तिघांवर नियमितपणे डॉक्टर लक्ष ठेवून राहाणार आहेत, तसेच त्यांना 29व्या दिवशी दुसरा डोस देण्यात येईल. त्यानंतर तीन व सहा महिन्यांनी त्यांच्यावरील परिणामांचा आढावा घेतला जाणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply