पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष
रेवदंडा ः प्रतिनिधी
रेवदंडा आगरकोट किल्ल्यातील सातखणी, तटबंदी, बुरूज व वास्तू दुरवस्थेत असून सर्वत्र झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षतेने येथील अनेक वास्तू ढासळण्याच्या स्थितीत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील मागील राज्य सरकारच्या काळात गड-किल्ल्यांच्या सुधारणांसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांना सुरुवात करण्यात आली होती, मात्र सद्यस्थितीतील सरकारकडून त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात आली नसल्यामुळे अनेक गड-किल्ल्यांसह ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था झाली आहे.
रेवदंडा येथे पोर्तुगीज काळातील समुद्रालगत आगरकोट किल्ला आहे. प्राचीन काळी येथून आंतरराष्ट्रीय व्यापार होत असे. पोर्तुगीजांनी व्यापारासह येथे भक्कम असा आगरकोट किल्ला बांधला. 16व्या शतकाच्या अखेरपूर्व आगरकोट किल्ल्यात महत्त्वाच्या इमारती बांधल्या असे लिखीत आढळते. सभोवतालच्या भिंतीच्या आतील बाजूस भव्य कॅथेड्रल रुग्णालय, सेंट पॉल जेझुई मोनॅस्टरी, डोमिनिकन फ्रान्सिस्कन चर्च, ऑगस्टिनियन चर्च व मोनॅस्टरी चर्च अशा धार्मिक इमारती होत्या. भिंतीच्या बाहेर सेंट सेबॅस्टियन चर्च, सेंट जॉन पॅरिस चर्च व मदर ऑफ गॉडचे कॅपूचिन चर्च अशा इमारती होत्या असे लिखीत आढळते. तसेच एकूण नऊ बुरूजांचा उल्लेख आढळतो.
तसेच दगडी, लोखंडी गोळा फेकणार्या तोफा येथे अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. या किल्ला परिसरात पोर्तुगीज काळातील फॅक्टरी किंवा चौकोनी बुरूजाचे कॅप्टनचे निवासस्थान व तुरुंगाभोवती लहानशा किल्ल्याचे अवशेष तसेच जेझुइट मोनॅस्टरी, सातखणी बुरूज, डोमिनिकन चर्च, मठ, सेंट झेवियर चॅपेल आणि या सर्वांभोवती संरक्षित भिंत पाहावयास मिळते.
सद्यस्थितीत या पुरातन वास्तू दुरवस्थेत असून येथे झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. यापूर्वी येथे देखभाल व स्वच्छतेसाठी पुरातत्त्व खात्याचे काही अधिकारी व कर्मचारीवर्ग दिसून येत होता, परंतु कोरोनाच्या कालावधीत परिसरात फिरण्यासाठी पर्यटकांना बंदी केल्याने येथे असलेले पुरातत्त्व अधिकारी व कर्मचारीवर्गसुध्दा हटविला गेला. त्यामुळे आगरकोट किल्ला परिसरात स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. शासन लॉकडाऊन हळूहळू शिथिल करीत असल्याने येथे आगरकोट किल्ला परिसरात पर्यटकांचा ओघ पुन्हा सुरू होईल. त्यामुळे परिसरातील स्वच्छता तसेच झाडेझुडपे साफ करणे आणि पुरातत्त्व खात्याचे अधिकारी-कर्मचारी तैनात करणे गरजेचे आहे.