शारजा : वृत्तसंस्था
10पीएल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात भारतीय संघाने कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 45 धावांनी दणदणीत विजय साकारला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 10 षटकांत 5 बाद 86 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा संघ मात्र 8.5 षटकांत 41 धावांमध्ये गारद झाला.
पाकिस्तानातून सातत्याने होत असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे भारताने त्यांच्याशी सर्व संबंधच तोडले आहेत. त्यामुळे उभय देशांमध्ये क्रिकेटच्या द्विदेशीय मालिकाही होत नाहीत, पण े उभय देशांना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहणे म्हणजे दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांना पर्वणी. हीच पर्वणी 10पीएलच्या तिसर्या पर्वाच्या निमित्ताने पाहायला मिळाली. दुबईतील शारजा येथील ऐतिहासिक मैदानावर बुधवारी (दि. 11) रात्री हा सामना रंगला.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताचा स्फोटक सलामीवीर ‘रायगडचा टायगर’ उस्मान पटेल याने 9 चेंडूंत 18 धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याचा सहकारी मोयोद्दीन शेख उर्फ मुन्ना मात्र अपयशी ठरला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कृष्णा सातपुते आणि थॉमस डायस यांनी धावफलक हलता ठेवला. त्यातही डायसने आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 15 चेंडूंत 25 धावा चोपल्या, तर सातपुतेने 12 धावा केल्या. त्यानंतर सुमित ढेकळेने 11 चेंडूंत 18 धावांची उपयुक्त खेळी केली. पाकिस्तानकडून झहीर कालियाने दोन, तर कर्नल झाहिद, मुबशर अहमद व सद्दाम शहा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारताचे आव्हान पाकिस्तानला पेलवले नाही. सुरुवातीपासून त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि सरतेशेवटी संघाचा संपूर्ण डाव 41 धावांमध्ये संपुष्टात आला. भारताकडून विश्वजीत ठाकूर आणि कर्णधार अंकुर सिंग यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले, तर विजय पवळे आणि सरोज यांनी दोन गडी बाद केले.
10पीएल स्पर्धा 8 ते 13 मार्च या कालावधीत खेळली जात आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ड्वेेन ब्राव्हो हा या स्पर्धेचा सदिच्छादूत असून, तो अंतिम सामन्याला हजेरी लावणार आहे.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …