Breaking News

उत्तम चालले आहे

या सरकारचे हे काय चालले आहे, असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचा एकेकाळचा मित्रपक्ष म्हणवणार्‍या पक्षातर्फे विचारला जात आहे. खरे पाहता असा प्रश्नच कोणाला पडायला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली संपूर्ण देश एकदिलाने वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहे. शत्रूशी निकराने मुकाबला करत आहे आणि त्याच वेळी स्वत:चा सर्वंकष विकासदेखील साधत आहे. केवळ टीकेसाठी टीका करणार्‍या विरोधकांना दुसर्‍याच्या पायातील कुसळ दिसते, परंतु स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही असेच म्हणावे लागेल.या घटकेला कोरोना विषाणूने संपूर्ण जगालाच वेठीला धरले आहे. जगातील जवळपास प्रत्येक देश बेजार झाला आहे. भल्याभल्या महासत्तांच्या अर्थव्यवस्थादेखील पुरत्या कोलमडून गेल्या आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांचा ‘नवा हिंदुस्तान’ आपल्या गरिबीचे तुणतुणे न वाजवता कोरोनाशी यशस्वी लढा देत आहे. अर्थव्यवस्थेचे रूळावरून घसरलेले गाडे पुन्हा मार्गी लावण्यासाठी केंद्रातील सरकार अहोरात्र काम करीत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात लाखो कुटुंबांची दुर्दशा झाली. त्यांना विविध मार्गांनी मदतीचा हात दिला तो केंद्र सरकारनेच. लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय मजुरांचे जत्थेच्या जत्थे आपापल्या गावी परतत असताना त्यांची काळजी रेल्वे खाते किती तत्परतेने घेत होते हे आपण पाहिलेच आहे. अशा संकटाच्या काळात भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया मोडून काढल्या. जम्मू-काश्मीरची सरहद्द आज तुलनेने शांत दिसते, त्यापाठीमागे भारतीय लष्कर आणि केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत. दुसरीकडे चीनने केलेल्या आगळिकीमुळे लडाखची सरहद्द धुमसू लागली. आजही ती पुरेशी शांत झालेली नाही, परंतु चीनच्या डोळ्याला डोळा भिडवून त्यांचे आक्रमण चिरडण्याची किमया भारतीय लष्कर आणि परराष्ट्र खात्याने करून दाखवली. भारताच्या या कामगिरीबद्दल अमेरिका आणि जर्मनीसारखी मोठी राष्ट्रे भारताचे कौतुक करताना दिसतात. सरहद्दीवरील धुमश्चक्री चालू असताना केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या उध्दारासाठी तीन-तीन नवीन कायदे आणले. या कायद्यांमुळे भारतातील गरीब आणि मेहनती शेतकर्‍यांची अडत-दलालांच्या तावडीतून कायमची सुटका झाली. कामगार कायद्यांबद्दलही तसेच म्हणता येईल. शेतकरी कायदा असो वा कामगार कायदा हे दोन्ही कायदे भारतातील क्रांतीची पावले मानायला हवीत. या कायद्यांमुळे देशातील शेतकरी आणि कामगारांचा उज्ज्वल भविष्यकाळ सुनिश्चित झाला. याच कालावधीमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन यथासांग पार पडले आणि साडेचारशे वर्षांच्या एका रक्तलांछित प्रकरणाला कायमचा पूर्णविराम मिळाला. वास्तविक कोरोना महामारीशी झगडताना इतके सारे केंद्र सरकारने घडवून आणले याचे कौतुक वाटायला हवे, परंतु विरोधासाठी विरोध करण्याचा दुराग्रह चालू ठेवणार्‍या भाजपच्या विरोधकांना या सरकारचे काय चालले आहे, असा प्रश्न पडतो याला दुर्दैव म्हणायचे नाही तर काय? गोरगरीब जनतेसाठी खुद्द पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार प्रचंड कष्ट उपसताना दिसत आहेत. तरीदेखील भाजपच्या एकेकाळच्या मित्रपक्षाला असा प्रश्न पडावा हे कशाचे लक्षण आहे? प्रगल्भ नेतृत्व नसलेल्या काँग्रेसने ही टीका केली असती तर समजण्याजोगे होते. हाच मित्रपक्ष सध्या राज्यात सत्तेवर आहे. बर्‍याच मिनतवारीने मिळवलेली सत्ता कशीबशी टिकवताना या सरकारची किती दमछाक होत आहे हे दिसतेच. निव्वळ टीका करून स्वत:च्या चुका दडवता येत नाहीत याचे भान असलेले बरे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply