अलिबाग : प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जे नागरिक मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकले नाहीत त्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. 23 व 24 फेब्रुवारी असे दोन दिवस मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व 2693 मतदार केंद्रांवर या मोहिमत मतदार नोंदणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (दि. 22) पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमांतर्गत सर्व मतदान केंद्रावर, मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्विकारण्यासाठी उपस्थित राहण्यासाबाबत निर्देश दिलेले आहेत. तसेच नागरिकांना आपले नांव मतदार यादीत आहे, की नाही हे तपासणीसाठी मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.कोणताही नागरीक मतदानापासून वंचीत राहू नये, यासाठी ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मतदार केंद्र अधिकरी मतदार केंद्रात मतदारांची नोंदणी करून घेणार आहेत. या मोहिमेसाठी सर्व राजकीय पक्षांची मदत घेण्यात येणार आहे. या मोहीमेत मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार ओळखपत्र आहे, म्हणजे आपले नाव मतदार यादीत आहे, असे समजू नका. मतदार ओळखपत्र हे मतदाराची ओळख पटविण्यासाठी असून, मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येते. मतदारांनी त्यांच्याकडे ओळखपत्र असले तरीही मतदार यादीत नाव आहे की, नाही याची खात्री करावी. -डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड