भाजपच्या ज्ञानेश्वर घरत यांच्याकडून डोंगराची पाहणी
मोहोपाडा : प्रतिनिधी
आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई माडभुवन या आदिवासी ठाकूर वस्तीलाही इर्शाळवाडीप्रमाणे दरडींचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी सारसई माडभुवन वाडी परिसराची पाहणी केली.
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई माडभुवन ही आदिवासी ठाकूर वस्ती आहे. किमान शंभर कुटुंब या ठिकाणी वास्तव्य करतात. डोंगराच्या पायथ्याशीच हे गाव वसलेले आहे. मोलमजुरी करणार्या या आदिवासींना रस्ता, लाईट, पाणी या समस्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते. गेल्यावर्षी येथील स्थानिक माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी सतत पाठपुरावा करत वनविभागाची परवानगी घेऊन रस्ता आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे, परंतु नुकताच झालेल्या इर्शाळवाडीच्या दुर्घटनेचा धस्का येथील आदिवासी लोकांनी घेतला आहे. या वस्ती लगत असलेल्या डोंगराला गेल्या वर्षापासून पावसाळ्यात तडे जात आहेत. डोंगर कधीही खचून ही दरड वाडीत येऊ शकते, अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. याचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन आमदार महेश बालदी यांनी तातडीने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी प्रत्यक्ष डोंगरावर जाऊन डोंगराला पडलेल्या भेगांची पाहणी केली आणि ग्रामस्थांना जागृत राहण्याच्या सूचना दिल्या तसेच पनवेल तहसीलदारांना संपर्क करून तातडीने पाहणी करून पुढील उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. ज्ञानेश्वर घरत या वेळी म्हणाले की, गेल्या वर्षी सारसई माडभुवन येथील डोंगराला गेलेली तडा गेली आहे. लवकरच संबंधित प्रशासन पाहणी करणार आहे. माझी शासनाला विनंती आहे की, या वाडीतील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याबाबत विचारविनिमय करावा. या वेळी त्यांच्यासोबत माजी सरपंच दत्ता पाटील, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, धर्मेंद्र भोईर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुशील ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लेंडे, माजी सदस्य बुधाजी दोरे, शनिवार उघडा, गोरख लेंडे, विजय लेंडे वाडीतील अनेक ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
आमदार महेश बालदी यांच्या आदेशानुसार आम्ही येथे पाहणी केली. या डोंगराला मोठी तडा गेली असून बरोबर त्याखाली माडभुवन वसलेले आहे. नुकसान होऊ नये म्हणून शासनाने या वाडीतील ग्रामस्थांना दिलासा द्यावा.
– ज्ञानेश्वर घरत, माजी जि.प. सदस्य