Breaking News

पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी उकळणार्या आरोपीला अटक

पनवेल : बातमीदार – करंजाडे येथे बिल्डींग मटेरियल सप्लाय करणार्‍या 36 वर्षीय व्यक्तीकडून बंदुकीचा धाक दाखवून खंडणी उकळणार्‍या गुन्हेगारास शहर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

करंजाडे, सेक्टर 5 येथील सचिन दत्ताराम कैकाडी हे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे काम करतात. या वेळी गावातील राजेश कैकाडी हा नेहमी त्यांच्याशी वाद घालत असे. 4 ऑक्टोबर रोजी राजेश कैकाडी हा सेक्टर 4, करंजाडे येथील साइटवर माल खाली करून देत नव्हता. या वेळी त्याने पैसे द्यावे लागतील, त्याशिवाय मटेरियल खाली करता येणार नाही, असे त्याने सचिन याला सांगितले. त्यानंतर त्याने त्याच्याजवळ असलेली पिस्तुल बाहेर काढून सचिन यांच्यावर रोखली आणि तुम्हाला इथेच ठार मारेन आणि इथेच संपवून टाकीन अशी धमकी दिली. घाबरलेल्या स्थितीत असलेल्या सचिन कैकाडी याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सोनावणे, निलेश राजपूत यांनी आरोपी राजेश कैकाडी उर्फ राजा कैकाडी याला त्याच्या घरातून अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता मेड इन यूएसए असलेले आणि दोन राऊंडपैकी एक राऊंड चेंबर लोड असलेले पिस्तुल मिळून आले.

पनवेल, करंजाडे, उरण, द्रोनागिरी, कामोठे, उलवे या परिसरात नवीन चालू असलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून राजेश कैकाडी व त्याचे साथीदार यांनी धमकावून खंडणीची रक्कम घेतली असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने नमूद परिसरातील बिल्डर डेव्हलपर्स यांना पोलिसांना आवाहन केले आहे की, राजेश कैकाडी यांनी खंडणीच्या स्वरूपात शस्त्राचा धाक दाखवून पैशाची मागणी केली असल्यास त्यांनी तत्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

12 गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी

आरोपी राजेश कैकाडी याच्यावर यापूर्वी खून आणि खुनाचा प्रयत्न, बलात्कार, सरकारी नोकरावर हल्ला, भारतीय हत्यार कायदा, गर्दी, मारामारी असे 12 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी संघटीत गुन्हा करण्याच्या सवयीचा असून त्याच्यावर यापूर्वी खारघर पोलीस ठाण्याकडून मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply