माणगाव : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी वाहतूक व्यवस्थेबाबत काही कडक निर्बंध आखले आहेत. पोलीस अधीक्षकांनी वाहतूक व्यवस्था विना अपघात सुरळितपणे सुरू ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता माणगावात दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. तसेच वाहन चलविताना मोबाईलवर बोलणे टाळा, असे आवाहन माणगावचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी केले आहे.
माणगावातील वाहतूक प्रश्नांसंदर्भात पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधून वाहतूक व्यवस्थेबाबत वाहन चालकांना विविध सूचना केल्या आहेत. दुचाकी स्वारांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे त्याबाबत सुरुवातीला चार दिवस वाहन चालकांना सूचना देण्यात येणार आहे. त्यानंतर हेल्मेट न वापरणार्या दुचाकी स्वारांवर वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करून पोलीस कारवाई करणार आहेत.
तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट जाणार्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणार्यावर कारवाई करण्यात येईल. रस्त्यावर तसेच पार्किंग नसणार्या ठिकाणी वाहने उभी करणार्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे पोलीस निरीक्षक इंगवले यांनी सांगितले.
वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत व पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी केले. या वेळी हवालदार श्रेयस म्हात्रे उपस्थित होते.