मुरूड : प्रतिनिधी
गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा अलिबाग जवळील वानरटोक सुळका मुरूड शेगवाडा येथील अतुल मोरे, विशाल मोरे व तोषित नायडू या गिर्यारोहकांनी अवघ्या 40 मिनिटात सर केला. आणि या सुळक्यावर तिरंगा फडकवला.
अलिबागपासून हाकेच्या अंतरावरावर सागरगड उर्फे खेडदुर्ग हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला असलेला वानरटोक नामक सुळका दुर्ग भटक्यांचे लक्ष वेधून घेतो. गडावर जायला मिळते पण वाट नसल्याने वानरटोक सुळक्यावर जाता येत नाही. अतुल मोरे यांच्या मनात हा सुळका सर करण्याचे स्वप्न होते. पावसाळा संपला, खडक कोरडा झाला आणि निर्णय पक्का झाला. पुरेसे आरोहण साहित्य घेऊन गिर्यारोहक अतुल मोरे व विशाल मोरे दोघांनी सुळक्यावर चढाई करायला सुरुवात केली. त्यांच्या तोषित नायडूसुद्धा होता.
सुळक्याला बोलटिंग नसल्याने अतुल मोरे यांनी आधीच घरी पेग (दोरीला मारलेली गाठ) बनवले होते, त्याच्या सहाय्याने एक एक टप्पा ते तिघे गाठत होते. सुळक्याचा खडक हा ठिसूळ असल्याने कधी कोणता दगड खाली येईल, हे सांगता येत नव्हते. पण अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी योग्यती काळजी घेत तासाभरात चढाई यशस्वी केली. त्यांची बॅकअप टीमसुद्धा होती. वॉकी-टॉकीच्या सहाय्याने संभाषण करत मदत चालू होती. बॅकअप टीममध्ये अश्विन विरकुड, विरेंद्र गायकर, विद्याधर गायकर, मयूर पाटील यांचा समावेश होता.