Breaking News

बिघाडीची अवलक्षणे

गेली दीड-पावणेदोन वर्षे सत्तेला चिकटून बसलेले महाविकास आघाडीचे सरकार अंतर्विरोधाची सारी लक्षणे आता स्पष्टपणे दाखवू लागले आहे. हे सरकार कोणी पाडण्याची गरज नाही, आपल्या अंतर्विरोधानेच ते पडेल, असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी केले होते. राजकारण्यांचे सोडा, अनेक राजकीय पंडितांचाही तोच अंदाज होता, तथापि इतका टोकाचा अंतर्विरोध असूनही या सरकारने बराच तग धरला हेही मान्य केले पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने तग धरण्यामागील कारणे प्रामुख्याने दोनच असू शकतात. पहिले कारण अर्थातच कोरोनाची साथ. गेल्या पावणेदोन वर्षांमधला बहुतेक काळ कोरोनाच्या महासाथीशी मुकाबला करण्यात गेला आहे. या जीवघेण्या संकटात सारी जनता अडकून पडली होती व अजूनही त्यातून महाराष्ट्राला सावरता आले नाही. साहजिकच अशा परिस्थितीमध्ये सत्ताकारण मागे पडत जाते. महाविकास आघाडी सरकारने तग धरण्याचे दुसरे प्रमुख कारण सत्तेचा गोंद हे आहे. हा गोंद भल्याभल्यांना एकत्र जोडू शकतो. सत्तेची फळे जोवर चाखायला मिळत आहेत तोवर वैचारिक मतभेद, अंतर्विरोध आदी बाबी दुय्यम ठरतात. सध्या मात्र परिस्थिती पालटू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. लोणावळा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी बेधडक काही मुक्ताफळे उधळली. सत्तेत भागीदार असतानाही पाठीत खंजीर खुपसला जात आहे, अशा प्रकारची भावना त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली. इतकेच नव्हे तर, आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे रोजच्या रोज आपल्या दैनंदिन कार्यक्रमाचे रिपोर्टिंग होत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. अर्थात अशी मुक्ताफळे उधळल्यानंतर काही तासांतच त्यांनी घूमजाव केले. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा नेहमीचा राजकीय कांगावा त्यांनी केला. नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळाचा नारा पुकारून एकच धमाल उडवली होती. त्यांच्या स्वबळाच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीचे धाबे दणाणले. त्यांच्या पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील स्वबळाचा पुकारा करावा लागला. त्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना आघाडी आणि युतीचे राजकारण विसरून पक्षवाढीच्या कामास लागावे, असा सल्ला दिला. महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी स्वबळाची भाषा सुरू केल्याने आता पुढे काय होणार या विवंचनेने सत्ताधार्‍यांना ग्रासले. नाना पटोले यांना राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी चक्क अनुल्लेखाने मारले. लहान माणसांच्या वक्तव्यांबद्दल मी काही बोलणे योग्य होणार नाही, अशी टिप्पणी महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांनी केली आहे. ती सूचक मानावी काय? अर्थात असल्या अंतर्गत वादविवादांमुळे सरकार लागलीच धोक्यात येत नसते हे लक्षात घेतले पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये स्वबळाची भाषा सुरू झाल्यानंतर समाजमाध्यमांवर भूकंप झाल्यागत प्रतिक्रिया उमटत आहेत. काही महाभागांच्या मते महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करण्याची हीच वेळ आहे. एकंदरीत महाविकास आघाडीतील अंतर्विरोधामुळे वातावरण तापू लागले असून निरनिराळ्या वावड्यांची वावटळे उडवण्यासाठी वातावरण पोषक आहे. वास्तविक महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे सारे टाळता आले असते. कोरोनाची साथ अजूनही पुरती ओसरलेली नाही. राज्याची आर्थिक घडी बसवण्याला सत्ताधार्‍यांचे प्राधान्य असायला हवे. त्याऐवजी एकमेकांचे सदरे खेचण्याचे राजकारण सुरू झालेले पाहायला मिळत आहे. ही बिघाडीचीच अवलक्षणे आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply