पेण : प्रतिनिधी
राज्यातील 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने ज्यांना नोटीस बजावलेली आहे, असे भ्रष्टाचारांचे आरोप असलेल्या उमेदवाराला रायगडचा खासदार बनवणार काय? खासदार कसा नसावा यांचे उत्तम उदाहरण मतदारांसमोर सुनील तटकरेच आहे. त्यामुळे मला आव्हानाची भाषा करणार्यांचे दिवस संपल्यात जमा आहेत. भ्रष्टाचारी तटकरेंना आता माझी औकात काय हे दाखवून देणारच, अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार ना. अनंत गीते यांनी वडखळच्या प्रचारसभेत घणाघाती हल्ला केला.
शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रचारार्थ वडखळ येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. गरीब शेतकर्यांच्या हजारो एकर जमिनी कवडीमोल भावात विकत घेऊन त्या नातेवाईक, नोकर, ड्रायव्हर यांच्या नावे करणारे, 151 बेनामी कंपन्यांचे मालक असणारे सुनील तटकरे यांनी ही माया कुठून गोळा केली याचे उत्तर त्यांना मतदारांना द्यावे लागेल. याउलट मी राजकीय जीवनात दोन वेळा केंद्रीय मंत्री होऊनसुद्धा भ्रष्टाचाराचा एकही डाग माझ्यावर पडलेला नाही, असे ना. गीते म्हणाले.
या सभेला सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रवीशेठ पाटील, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, पेण तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, वडखळचे सरपंच राजेश मोकल, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद मोकल, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझी औकात काढणार्यांना आता दाखवून देतोच. एक साप अलिबागच्या सभेत ठेचला. आता दुसर्या सापाला 23 तारखेला ठेचायचे काम बाकी आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात मतदार पेटून उठला. त्यामुळे विरोधकांना हादरे बसलेत, असे सांगून ना. अनंत गीते म्हणाले की, केंद्रीय अवजड खात्याचा मंत्री म्हणून काम करताना 20 आजारी उद्योगांना माझ्या मंत्रिपदाच्या काळात चांगल्या स्थितीत आणले. भारत इलेक्टॉनिक भेल कारखान्याला 14 हजार कोटींचा तोटा होता. या उद्योगाला पूर्वपदावर आणताना 1500 कोटींचा नफा केंद्र सरकारला मिळवून दिला. रायगडच्या विकासाचा संकल्प युती सरकारकडे आहे. मोठ-मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी हजारो कोटींचा निधी भविष्यात खर्च होणार आहे. मंत्रिपदाच्या कार्यकाळात सदाचाराने वागलो आणि यापुढेही वागत राहीन.
शिवसेना, भाजप व मित्रपक्षांची युती ही मनोमीलनाची असून आम्ही एका विचाराने एकत्र आलोत. त्यामुळे युतीची ताकद फार मोठी असून, गेल्या निवडणुकीत रवीशेठ पाटील यांच्यामुळे कमी फरकाने विजय झाला असला, तरी आता रवीशेठ आमच्या बाजूला आहेत. त्यांची 62 हजार मते, शिवसेनेची 44 हजार मते, भाजपची 18 हजार मते अशी सव्वालाख मतांची बेगमी युतीकडे आहे. म्हणून माझा विजय एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने रायगडची जनता करणार, असा विश्वासही ना. गीतेंनी व्यक्त केला.
सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले की, देशात आठ कोटी शौचालये भाजप सरकारने निर्माण करून स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविले आहे. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे देशातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून, सरकारच्या कामांवर व पंतप्रधानांच्या कारभारावर जनता समाधानी आहे. त्यामुळे 17व्या लोकसभा निवडणूकपूर्व कल चाचण्यांच्या सर्व्हेमध्ये एनडीए सरकारलाच बहुमत असल्याचे विविध वृत्तवाहिन्यांवर दाखविले जात आहे. या लोकसभात निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना सातव्यांदा विजयी करून पुन्हा केंद्रात पाठविण्याचे आवाहन माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी केले.
एनडीए सरकार निवडून येणार : आ. प्रशांत ठाकूर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्तिशाली भारत बनविण्याचा जो संकल्प केलेला आहे त्यानुसार केंद्रातील एनडीए सरकार व राज्यातील युतीचे सरकार जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहेत. 17व्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचे 300 खासदार निवडून येऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून दुसर्यांदा शपथ घेतील आणि 2022 साली देशाचे अमृत महोत्सवी वर्ष एनडीए सरकारच साजरे करणार, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या सभेत केले.
शेकाप-राष्ट्रवादीची युती ही साप-मुंगुसाची -रवीशेठ
या वेळी माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी बोलताना सांगितले की, शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची झालेली युती ही साप-मुंगुसाची आहे. ते पुढे म्हणाले, शेकाप आमचा एक नंबरचा राजकीय शत्रू असून, शेकापशी आम्ही कधीच तडजोड करणार नाही; तर सुनील तटकरेंनी वेळोवेळी विश्वासघात केल्याने त्यांच्यावर भरोसा कसा करायचा? काँग्रेसने अन्याय केल्याने मी भाजपमध्ये प्रवेश केला. देषाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खर्या अर्थाने रायगडच्या विकासाला चालना देतील असे माझ स्पष्ट मत आहे.