Breaking News

राष्ट्रवादीचे नेते घोटाळेबाज आणि जुलमी

आमदार प्रशांत ठाकूर यांचा हल्लाबोल

पनवेल : रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या पाच वर्षांच्या काळात लोकहिताच्या अनेक योजना आणून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. मग 50 वर्षे सत्ता भोगणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीला सर्वसामान्यांसाठी योजना का आणता आली नाही? उलट काँग्रेस आघाडी सरकारमध्ये झालेल्या सिंचन घोटाळ्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. त्याच वेळी मावळमध्ये शेतकर्‍यांवर झालेला गोळीबारही जनता विसरलेली नाही. अशा या घोटाळेबाज आणि जनतेवर अन्याय करणार्‍या जुलमी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदार कदापिही माफ करणार नाही, असा हल्लाबोल सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) नेरे येथे केला.

शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार तथा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल भाजपच्या वतीने वावंजे आणि नेरे जिल्हा परिषद विभागातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा करणारे तेच पैसे निवडणुकीला खर्च करतील, पण त्यांच्या भूलथापांना बळी न पडता मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पर्यायाने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

नेरे येथील सन्मित्र गणेश मंडळाच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख व मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार बबन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास पाटील, भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, शिवसेना नेते परेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, रेश्मा शेळके, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शिवाजी दुर्गे, रमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी विविध योजना राबविल्या. शेतीला हमीभाव, बिल्डर्सकडून होणार्‍या फसवणुकीला आळा घालण्यासाठी रेरा, बेघरला घर, शौचालये, गॅस, विमा, आरोग्यदायी योजना, सेवा हमी कायदा, शासकीय काम करण्याची सुलभता, बँक खाते, मेक इन इंडिया, स्किल इंडिया, रस्ते, सुरक्षा, अशा अनेक लोककल्याणकारी योजना पंतप्रधान मोदींनी राबवून जगात आपल्या देशाला सर्वात वेगवान अर्थव्यवस्था बनविण्याचे आणि सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यामुळे आपल्या देशाची जगात प्रतिमा उंचावली आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना प्रत्येकाला स्वतःचा निवारा मिळाला पाहिजे, या सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून पंतप्रधान काम करीत असल्याचा उल्लेख करतानाच त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाट्याने विकास होत असून, त्याला जगामध्ये तोड नाही, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकापच्या स्वार्थीपणाचा बुरखा फाडला. निवडणूक आली की रस्त्याच्या कामाला खडी टाकायची आणि निवडणूक झाल्यावर तीच खडी उचलून न्यायची ही शेकापची नीती असून, कर्नाळा ग्रामपंचायतीत मतदान न केल्यामुळे आदिवासी बांधवांचे पाणी तोडण्याचे पाप शेकापने केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. विकासकामांच्या बाबतीत आपण अग्रेसर आहोत, त्या जोरावर श्रीरंग बारणे यांना मते मिळवून देऊ असे सांगून, बारणे यांनी खासदार म्हणून केलेली कामे सर्वसामान्यांच्या हिताची असून, ते मोठ्या मनाचा माणूस म्हणून परिचित आहेत. भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे कार्यकर्ते हातात हात घालून काम करीत आहेत. त्यामुळे बारणे यांचा विजय पक्का आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करून युतीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार करून मताधिक्य मिळविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही आमदार ठाकूर यांनी केले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, अनेक राष्ट्रांच्या धमक्या आल्या, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही घाबरले नाहीत. लोकसभेत काम करीत असताना त्यांचा सहवास मला लाभला. देशाच्या विकासासाठी ते अहोरात्र काम करीत आहेत. देश सुरक्षित ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. या वेळी दत्ता दळवी, बाळासाहेब पाटील, बबन पाटील, अरुणशेठ भगत यांचीही भाषणे झाली.

शेकाप पैसे खाणारा पक्ष : खा. श्रीरंग बारणे

खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला, माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर आमच्या पाठीशी आहेत, त्यामुळे भीती नाही, असा स्पष्ट निर्वाळा दिला. पनवेल-उरणमधून शेकापला नेस्तनाबूत करण्याचे काम ठाकूर पिता-पुत्राने केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, अंतर्गत भांडणामुळे अजित पवारांनी शरद पवारांना घरी बसविण्याचे काम केले. भ्रष्टाचार करणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्योगच आहे. या भ्रष्टाचाराने राष्ट्रवादी बदनाम झाली आहे; तर दुसरीकडे निवडणूक हा शेकापचा मूळ व्यवसाय असून, शेकाप हा पैसा घेणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सध्या शेकापच्या कुबड्या घेऊन चालत आहे आणि शोबाजी करून अधिकचा माल लुटण्याचे काम शेकाप करतोय, असा घणाघात बारणे यांनी केला.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply