Breaking News

गेल्या महिनाभरात शरद पवारांची भेट घेतलेली नाही

निराधार वृत्ताचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून खंडन

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली, अशी बातमी काही चॅनेलवर चालवली जात आहे. या वृत्ताचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी खंडन करून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना बहुमताने विजयी करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

याबाबत बोलताना सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, रामशेठ ठाकूर साहेब आणि मी भारतीय जनता पक्षाचे आहोत. शिवसेना, भाजप आरपीआय आणि मित्रपक्ष अर्थात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी खासदार म्हणून पाच वर्षे केलेली कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागलो आहोत. गेल्या महिनाभरात शरद पवार आणि आमची भेट झालेली नाही. पनवेल, उरण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व जवळपास नाही आणि त्यामुळे केवळ या निवडणुकीच्या निमिताने हे राष्ट्रवादीला मदत करतील, अशी चर्चा रंगवायची आणि त्या माध्यमातून अफवा पिकवायची योजना विरोधकांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच देशाचा विकास होऊ शकतो, हे पनवेल आणि उरण तालुक्यासह देशातील सर्वसामान्य जनतेला माहीत आहे आणि जनतेचा तसा विश्वास पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वावर आहे. त्यामुळे येत्या 29 एप्रिलला आपल्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय पक्का आहे. त्यांना मताधिक्य मिळवून देणे हे आमचे काम आहे. त्यांचा जोरदार प्रचार आम्ही करत आहोत. आम्ही त्यांच्या पाठीशी उभी केलेली ताकद मतदानाच्या आकड्याच्या रूपाने निश्चितच दिसेल आणि श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार म्हणून लोकसभेत जातील, असा ठाम विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. विरोधकांकडून पसरवल्या जाणार्‍या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply