पनवेल : वार्ताहर
पोलीस असल्याची बतावणी करून दोघा तोतया पोलिसांनी कामोठे भागात राहणार्या वृद्ध दाम्पत्याजवळचे 38 हजार रुपये किमतीचे दागिने लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे पोलिसांनी या तोतया पोलिसांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या घटनेत फसवणूक झालेल्या दाम्पत्याचे नाव वासुदेव कुंभार (66) आणि वसुमती कुंभार (63) असे असून ते कामोठे सेक्टर-18मध्ये राहण्यास आहेत. गत सोमवारी सकाळी हे दाम्पत्य किराणा सामान खरेदी करण्यासाठी सेक्टर-21मधील दुकानात गेले होते. किराणा माल खरेदी करून दोघेही आपल्या घरी परतत असताना अॅक्टिव्हा स्कुटीवरून त्यांच्याजवळ आलेल्या एका भामट्याने पोलीस असल्याचे सांगून पुढे चेकिंग सुरू असून त्यांच्या सामानाची तपासणी करण्याचा बहाणा केला.
या वेळी त्या ठिकाणी आलेल्या दुसर्या भामट्यानेदेखील पोलीस असल्याचे सांगून त्यानेदेखील पोलिसांची तपासणी सुरू असून त्यांच्या अंगावरील दागिन्यांबाबत विचारणा होईल, असे सांगितले. तसेच वासुदेव कुंभार यांना अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. या भामट्याने हातचलाखी करून त्यांचे दागिने काढून घेतले. त्यानंतर दोघे भामटे त्या ठिकाणावरून निघून गेले. काही वेळानंतर कुंभार यांनी पिशवी तपासली असता त्यात दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर दाम्पत्याने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. त्यानुसार भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.