पनवेल : वार्ताहर
पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कुसूम म्हात्रे यांना कामोठे वसाहतीत काही अज्ञात चोरट्यांनी घेरून अंगावरील सोने लुटल्याची घटना घडली आहे. चक्क नगरसेविकेला कामोठे वसाहतीमधील भर रस्त्यात लुटण्याच्या घटनेमुळे वसाहतीमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जवळपास आठ ते 10 तोळे सोने चोरट्याने लंपास केल्याचे सांगितले जात आहे. या बाबतची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.कुसुम रवींद्र म्हात्रे असे लुबाडलेल्या नगरसेविकेचे नाव आहे. कुसुम म्हात्रे या आपल्या महिला कार्यकर्त्यांसोबत पक्षाच्या कार्यक्रमासाठी मुंबई येथे गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर, खासगी गाडीने कामोठे वसाहतीजवळील महामार्गावर उतरल्या. या वेळी, त्यांच्या सोबत पाच ते सात महिला कार्यकर्त्या देखील होत्या. कामोठे हायवेवरून म्हात्रे आणि त्यांच्यासोबतच्या महिला या चालत आपल्या घरी परतत होत्या. याचवेळी म्हात्रे आणि या महिला मुख्य रस्त्यावरील शुभांगण कॉम्प्लेक्सजवळ आल्यानंतर काही अज्ञात चोरट्याने त्यांच्याजवळ येऊन गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी चोरट्याच्या हातात जे काही लागेल ते सोने घेऊन चोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याच्या हातात चेन आणि गंठणचा काही भाग हातात लागेल हे पहाता चोरट्याने पुन्हा महिलेजवळ येऊन राहिलेले सोने चोरण्याच्या प्रयत्न केला. याचवेळी म्हात्रे यांनी ओरडणे सुरू केल्यामुळे चोरटा घटना स्थळावरून फरार झाला. चोरटा सोन्याची चैन आणि गंठण लंपास करून फरार झाला होता. विशेष म्हणजे चोरटे पायी आला आणि पळत गेला. ही घटना घडताना इतर पुरूष मंडळी रस्त्यावर होते. मात्र इतर पुरुष मंडळींनी थोडा विरोध देखील केला नाही किंवा, चोरट्याच्या मागे धावले देखील नाही. मात्र ही घटना जेव्हा घडली तेव्हा नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी थेट, कामोठे पोलीस स्टेशन गाठले. या बाबतची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास कामोठे पोलीस घेत आहे.