Breaking News

ऐतिहासिक पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वच राज्यांनी लसीकरणासाठी कंबर कसली आहे. लसीकरणासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयात निदान राजकारण होऊ नये एवढी अपेक्षा विरोधकांकडून जनतेला आहे. कारण ज्या गोष्टीशी पंतप्रधान मोदी यांचे आणि भारतीय जनता पक्षाचे नाव जोडले गेले असेल त्या प्रत्येक गोष्टीला टीकेचे लक्ष्य करण्याचे विरोधकांचे धोरण दिसते. निदान जनतेच्या आरोग्याशी निगडित अशा लसीकरणाला विरोधकांनी देखील पक्षभेद विसरून पाठबळ द्यायला हवे.

भारताच्या इतिहासामध्ये आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जाईल. किंबहुना, एका अर्थी स्वातंत्र्यलढ्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा भारतीय समाजाने आजच्या दिवशी गाठला अशी नोंद देशाच्या इतिहासात करावी लागेल. कारण जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला आज सुरूवात होत आहे. कोरोना विषाणूच्या थैमानापुढे सारे जग हतबल झालेले असताना भारताने मात्र अत्यंत कणखरपणे या घातक विषाणूला थोपवून धरले. इतकेच नव्हे, तर बहुतांश प्रमाणात त्याला नामोहरम देखील करून दाखवले. भारतासारखा अफाट लोकसंख्येचा विकसनशील देश कोरोनाच्या भयानक महामारीला कसे तोंड देणार अशी शंका प्रारंभीच्या काळात प्रगत राष्ट्रे व्यक्त करत होती. जागतिक आरोग्य संघटनेलाही तशी भीती वाटत होती. परंतु कोरोनाचा मृत्यूदर तुलनेने बराच आटोक्यात ठेवून दाखवत भारतीय जनतेने जगासमोर नवा वस्तुपाठ ठेवला. महामारीशी कसे लढतात याचे उदाहरण भारताने जगासमोर ठेवले. याचे श्रेय नि:संशयपणे अहोरात्र राबणार्‍या कोरोना योद्ध्यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळस नेतृत्वाला द्यावे लागेल. कोरोना विषाणूविरुद्धच्या निर्णायक लढाईला आता तोंड फुटले आहे. या लढाईचा प्रारंभ आजपासून राष्ट्रीय पातळीवर सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेने होईल. त्यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन ही दोन अमोघ अस्त्रे लसींच्या रूपाने भारताच्या दिमतीला आहेत. देशभरात एकंदरीत 3006 ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली असून कोविन या अ‍ॅपद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल. ही मोहीम पुढील अनेक महिने चालू राहील व त्यासाठी आपण सार्‍यांनी तयार राहिले पाहिजे. सुरूवातीच्या काही महिन्यांमध्ये कोरोना योद्ध्यांसाठी तब्बल तीन कोटींहून अधिक डोस केंद्र सरकारतर्फे विनाशुल्क देण्यात येणार आहेत. येत्या काही महिन्यांत आणखी चार वेगवेगळ्या प्रकारच्या लसी उपलब्ध होतील असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला असल्याने लवकरच लसीकरणाची ही मोहीम वेगाने पुढे जाईल असे दिसते. 137 कोटी लोकसंख्येच्या देशात प्रत्येक नागरिकाला लस उपलब्ध करून देणे खरोखर कठीण आव्हान आहे. ते पंतप्रधान मोदी यांच्यासारखा खंबीर नेताच पेलू शकेल यात शंका नाही. अन्य कुणीही नेता त्यांच्या जागी असता तर आपल्या देशाचे आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईचे स्वरुप काय असते याची कल्पना देखील करवत नाही. कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात समाज माध्यमांमध्ये अनेक समज-गैरसमज आणि अफवांचे पीक उगवते आहे. आपल्यासारखी सामान्य माणसेच अशा प्रकारच्या अफवांना बळी पडतात. विशेष म्हणजे कळत-नकळत आपणही त्या अफवांच्या बाजारात सहभागी होत असतो याचेही भान ठेवणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या व्यापक मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देणे हे समाज म्हणून आपले परम कर्तव्य आहे. लसीकरणाच्या दरम्यानच कोरोना विषाणूला आपण पूर्णत: नष्ट केलेले असेल. म्हणूनच या अफाट योजनेला ऐतिहासिक म्हटले पाहिजे.

Check Also

यंदाचा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमागील वर्षी नमो चषक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याचप्रमाणे …

Leave a Reply