पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिली माहिती
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोना काळात प्रत्यक्ष गुन्हे कमी झालेली असली तरी 2020 या वर्षात नवी मुंबई शहरात सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. 2019 च्या तुलनेत ही वाढ तीन पटीपेक्षा जास्त असून उकल होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे पोलिसांपुढे हे मोठे आव्हान असणार आहे.
नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी (दि. 14) पत्रकार परिषद घेत वार्षिक गुन्हे आढावा घेतला. यात शहरात 2019च्या तुलनेत 2020 मध्ये एक हजार 556 गुन्ह्यांत घट झाली असल्याचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली. कोरोना काळात लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गुन्हे कमी घडल्याने ही घट दिसत आहे. असे असले तरी त्याचा गुन्हे प्रगटीकरण टक्केवारीत फरक पडलेला दिसत आहे. यात तीन टक्क्याने घट झाली आहे. या वर्षात आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण हे दुपटीपेक्षा जास्तीने वाढले आहे. 2019 मध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण 25.36 होते ते 2020 वर्षात 68.42 टक्के पर्यंत गेले आहे.
पोलिसांनी या वेळी दिलेल्या आकडेवारीनुसार, 2020 या वर्षात 232 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून यातील फक्त 21 गुन्हे उकल झाले आहेत. 2019 मध्ये शहरात 74 गुन्ह्यांची नोंद झाली होती. 12 गुन्ह्यांची उकल झाली होती. या दोन वर्षांत 306 गुन्हे घडले असून यातील एकही गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. टाळेबंदीत ऑनलाइन व्यवहार वाढल्याने हे गुन्हे वाढले असून यात ओटीपी, क्यूआर कोडचा वापर करीत 55 तर ‘ओएलएक्स’वरून 32, फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीतून चार, ऑनलाइन फसवणुकचे 109, कार्ड क्लोनिंगचे 15 तर ऑनलाइन नोकरीच्या आमिषातून नऊ असे, असे 224 गुन्हे घडले आहेत. तर एक हजार 600 पेक्षा अधिक तक्रारी सायबर शाखेकडे आल्या आहेत.
आगामी काळातही यात वाढ होणार असल्याने सायबर गुन्हे घडू नयेत म्हणून जनजागृतीबरोबर ते उकल करणे हे पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे. पत्रकार परिषदेत सहआयुक्त बीजी शेखर पाटील, जय जाधव, गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार, परिमंडळ एकचे उपायुक्त सुरेश मेंगडे, वाहतूक शाखा उपायुक्त पुरुषोत्तम कराड आदी उपस्थित होते.
रस्ते अपघातांत घट
रस्ते अपघातांत 2020 मध्ये घट झाली आहे. 330 मोटार अपघात झाले असून 252 जणांचे अपघाती मृत्यू झाले आहेत 2019 मध्ये 501 अपघातांत 271 जणांचा मृत्यू झाला होता. येत्या काही दिवसांत रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये नवी मुंबई पोलिसांनी सांगितले.
ड्रग्ज फ्री नवी मुंबई मिशन सक्रीय
ड्रग्ज फ्री नवी मुंबई मिशनअंतर्गत या वर्षी 93 लाख 99 हजार 552 रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून 61 गुन्हे दाखल आहेत. यात 106 आरोपींना अटक केली आहे. तंबाखूजन्य पदार्थावर बंदी असताना विक्री होत असल्याने 2020 मध्ये पोलिसांनी 59 लाख 30 हजार 908 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. 27 हजारांच्या सिगारेट जप्त केल्या आहेत.