महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नियोजन
उरण, जेएनपीटी : वार्ताहर, प्रतिनिधी
महाशिवरात्रीनिमित्त घारापुरी (एलिफंटा) येथे सोमवारी (दि. 4 मार्च) शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक जात असतात. मोरा ते घारापुरी बोटीने जावे लागते. भक्तांची खूप गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार व अपघात होऊ नये यासाठी बोट मालकांनी कोणती खबरदारी घ्यावी व काय उपाययोजना कराव्यात, तसेच सतर्क राहण्यासाठी मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 21) बैठक घेण्यात आली. मोरा मच्छीमार सोसायटी येथे झालेल्या या बैठकीस बोटमालक, पोलीस मित्र, सागर रक्षक दल, मच्छीमार बांधव उपस्थित होते. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यात ज्या बोटींना परमिशन दिले आहे त्यांनीच प्रवाशांची ने-आण करावी, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेऊ नयेत, पाण्याची व्यवस्था करावी, छोट्या बोटीमध्ये प्रवासी वाहतूक करू नये, बोटीमध्ये लाइफ जॅकेट ठेवणे, सतर्क राहावे, सुरक्षेविषयी सामुग्री बोटीमध्ये ठेवावी, असे सांगण्यात आले. या बैठकीस उरणचे उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मोरा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रवीण कोळी, नगरसेविका आशा शेलार, घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर, केगावचे सरपंच जगजीवन नाईक, बंदर निरीक्षक प्रभाकर पवार, हनुमान कोळीवाड्याचे पोलीस पाटील अजय कोळी, दिगंबर म्हात्रे, मोरा मच्छीमार सोसायटीचे सदस्य, मोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सलीम तडवी, सचिन गोडे आदी उपस्थित होते.