Breaking News

मतदार लोकशाहीचा प्राण -तहसीलदार दिलीप रायन्नावर

पाली ः प्रतिनिधी

जगातील सर्वांत मोठी सार्वभौम्य लोकशाही असलेला देश म्हणून भारत देशाची ओळख आहे. समानतेची शिकवण लोकशाही देते. अशा लोकशाहीचा प्राण हा मतदार आहे. मतदारांनी जागृत व जबाबदार असले पाहिजे. निःपक्षपातीपणे चांगल्या उमेदवाराला निवडणे हे सक्षम लोकशाहीसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी केले. येथील ग. बा. वडेर हायस्कूलमध्ये सोमवारी (दि. 25) राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा झाला. त्या वेळी तहसीलदार रायन्नावार यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात प्राथमिक शिक्षकांनी पथनाट्याचे सादरीकरण केले, तसेच मतदानाची शपथ घेण्यात आली. या वेळी नवमतदारांचे अभिनंदनही करण्यात आले.

पूर्ण देशभर हा कार्यक्रम राबविला जातो. या वेळी मतदार जनजागृती केली जाते, असे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी सांगितले. पालिवाला महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजली पुराणिक यांनी सांगितले की, मतदान हा आपल्या लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव आहे. मतदानाचा हक्क सर्वांनी बजावलाच पाहिजे. नायब तहसीलदार सुभाष राऊळ म्हणाले की, मी विद्यार्थ्यांमध्ये भावी मतदार म्हणजेच उगवता सूर्य पाहतोय. त्यांनी लोकशाहीची माहिती देऊन मतदार दिनाचे घोषवाक्यही सांगितले. यापुढे 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदार नोंदणीचा अर्ज भरून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. महाविद्यालयात मतदार नोंदणीचा कॅम्प घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर प्राथमिक शिक्षकांनी मतदारराजा जागा हो, हे प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. यात अनिल राणे, कमलाकर शिंदे, जनार्दन भिलारे, राजू बांगरे, राम संकाये, दामोदर शिद, सतीश खाणेकर आदींनी आपली कला सादर केली. या वेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब घोडके, उपमुख्याध्यापक शांताराम बेलोसे, पर्यवेक्षक सुरेश पायानी व सुधाकर पाटील, कृष्णा वाघुले, विक्रम काटकर, शेखर राऊत, सुगंधा जाधव, अंकुश सोहनी, बीएलओ जयश्री जाधव, संजय घोसाळकर, श्रीनिवास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत खेडेकर यांनी, तर आभार अशोक कुंवर यांनी मानले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply