नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
झटपट श्रीमंतीच्या मोहात अनेकजण दामदुप्पट देणार्या कंपन्यांच्या जाळ्यात फसत आहेत. अशा गुंतवणुकीतून फसवणूक झाल्याचे दोन वर्षांत 20 गुन्हे दाखल झाले आहेत, तर फसवणूक होण्यापूर्वीच पोलिसांनी पाच कंपन्यांवर गुन्हे दाखल करून कोट्यवधींचा अपहार वेळीच टाळला आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना जादा नफ्याचे आमिष दाखवून लुटणार्या कंपन्यांचे जाळे देशभर वाढत आहे. अशाच काही कंपन्यांनी नवी मुंबईतदेखील आपले जाळे पसरविले आहे. यापूर्वी अशा कंपन्यांकडून झालेले कोट्यवधींचे अपहार राज्यभरात गाजलेले आहेत. त्यानंतरही नागरिकांना दामदुप्पट योजनेतून झटपट श्रीमंतीचे स्वप्न दाखवून गुंतवणूक करून घेणार्या कंपन्या राज्यभरात जाळे पसरत आहेत. अशा कंपन्यांनी नवी मुंबईतून एक हजाराहून अधिक व्यक्तींना आपल्या जाळ्यात गुंतवले आहे. त्यापैकी काही व्यक्ती एजंटची भूमिका बजावत असतात. कोणतीही नवी कंपनी आल्यास सुरुवातीला छोटी गुंतवणूक करून इतर गुंतवणूकदारांची साखळी वाढवत जाण्याची त्याची भूमिका असते. यासाठी दिखाव्याकरिता गुंतवणूकदारांपुढे श्रीमंतीचा थाट मांडला जातो. मात्र सुरुवातीचे काही महिने नफा दिल्यानंतर गुंतवणूकदार वाढताच जमा झालेले कोट्यवधी रुपये लाटून कंपन्या पळ काढतात. अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दोन वर्षांत 20 गुन्हे घडले आहेत. त्यात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला असून, काही आरोपी अद्यापही पोलिसांना चकवा देत आहेत. परिणामी 2019 पासून गुन्हे शाखा पोलिसांनी अशा कंपन्यांच्या सेमिनारवर पाळत घेऊन गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली.
जादा नफ्याचे आमिष दाखवून नियमबाह्य गुंतवणूक करून घेणार्या कंपन्यांकडून अनेकांची फसवणूक होत आहे, अशी कंपनी बंद करून संबंधितांनी पळ काढल्यानंतर नागरिक तक्रार करतात. यामुळे फसवणूक होण्यापूर्वीच अशा कंपन्यांचा शोध घेऊन कारवाई केली जात आहे. नागरिकांनी अशा कंपन्यांच्या आमिषाला बळी पडू नये. -प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा