Breaking News

रायगड कोणाला आंदण दिलेले नाही !

अनंत गीते यांचा सुनील तटकरेंना सूचक इशारा

पेण : प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असून, सुनील तटकरे रायगडचे खासदार, तर त्यांची कन्या आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री आहेेत, मात्र रायगड कोणाला आंदण दिलेले नाही असा इशारा शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी कोणाचेही नाव न घेता मित्रपक्षांना लगावला आहे. पेणमध्ये शिवसेनेच्या वतीने सोमवारी (दि. 25) आयोजित पक्षाच्या शिबिरात ते बोलत होते.
पेण तालुका कार्यकारी शिबिराचे आयोजन आगरी समाज सभागृहात करण्यात आले होते. या शिबिरास शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी, सल्लागार बबन पाटील, संपर्कप्रमुख विलास चावरी, शिवसेना नेते रशाद मुजावर, जि. प. सदस्य किशोर जैन, जि.प.चे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, शिवसेना महिला जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, शहरप्रमुख सुधाकर म्हात्रे, बाळा म्हात्रे, युवासेनेचे चेतन मोकल, प्रसाद देशमुख, आशिष वर्तक आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  
या वेळी बोलताना अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधताना सांगितले की, रायगड मतदारसंघ कोणाला आंदण दिलेला नसून ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिलेली आहे. रायगड जिल्ह्यात आज शिवसेनेचे तीन आमदार आहेत, मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामे करण्यास अडचण येते. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थानी असल्याने सत्तेचा वापर करीत राष्ट्रवादी पक्षवाढ व विस्तार करीत आहे, पण ते मित्रपक्षांना विश्वासात घेत नसल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.  
गिते पुढे म्हणाले की, आगामी निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. वरच्या पातळीवरील राजकारणात काहीही घडो, मात्र स्थानिक पातळीवर शिवसेना पदाधिकारी जो निर्णय घेतील त्याचीच अंमलबजावणी करण्यासाठी वरिष्ठांना भाग पाडू.
पेणमधील जेएसडब्ल्यूचा कार्यक्षेत्रातील 42 गावांचा पाणी पुरविण्याचा करार कंपनीकडून लेखी स्वरूपात घेण्याचे काम आपण केलेले आहे. खारेपाटातील पाणी योजना, खारभूमी योजनांसाठी  निधी मंजूर करण्याचे आपल्या काळात झाले. याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर वेळीवेळी बैठका घेतल्या, पण सध्याची परिस्थिती बदलली असून रायगडातील नेत्यांना जनतेप्रती आस्था नसल्याचे चित्र दिसत आहे, असा आरोपही गीते यांनी केला. आमदार महेंद्र दळवी यांचेही समयोचित भाषण झाले. सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले, तर आभार दीपश्री पोटफोडे यांनी मानले.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply