Breaking News

खारघरमध्ये गोळीबार करणारे अटकेत; व्यवसाय सुरू करण्यासाठी गुन्हेगारी

पनवेल : वार्ताहर

पेण येथून नवी मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या प्रतीक रवींद्र आहेर (वय 24) या तरुणावर शनिवारी रात्री खारघर येथे गोळीबार करून फरार झालेल्या चारही आरोपींना अटक करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. विपीन शैलेंद्र ठाकुर (वय 19), गोपाल ननु सिंह (वय 23), अभिनंदनकुमार गणेश शर्मा (वय 23) आणि मुचन नागेंद्र ठाकूर (वय 19) अशी या आरोपींची नावे असून, त्यांनी लुटमारीच्या उद्देशाने प्रतीक आहेर याच्यावर गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे लुटमारी करुन मिळालेल्या पैशांतून हॉटेल सुरू करण्याची या तरुणांची योजना असल्याचे तपासात आढळुन आले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून रिव्हॉल्वर व जिवंत काडतुस जफ्त केले आहे. या आरोपींच्या गोळीबारात जखमी झालेला प्रतीक आहेर हा तरुण पेण शहरात राहण्यास असून तो इस्टेट एजंटचा व्यवसाय करतो. शनिवारी तो फिरण्यासाठी खारघरला होता. रात्री वाशी येथून सायन-पनवेल महामार्गाने पनवेलकडे जाताना कोपरा गाव बस स्टॉपच्या मागील रोडवर सिगारेट पीत असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्याच्याकडे मोबाइल, पैसे व दुचाकीची मागणी केली, मात्र प्रतीक यांने यास विरोध केला. या वेळी एकाने जबरदस्तीने त्याच्यापासून मोबाइल घेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केला असता एका आरोपीने प्रतीकच्या डाव्या पायाच्या मांडीवर गोळी झाडली. या गोळीबारात प्रतिक जखमी झाल्यानंतर तिघा आरोपींनी त्या ठिकाणावरुन पलायन केले होते.  या घटनेची माहिती मिळ्यानंतर खारघर पोलिसांनी जखमी प्रतीक आहेर याला प्रथम खारघरमधील सिटी हॉस्पिटल व त्यानंतर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर गोळीबार करणार्‍या आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला होता. त्यासाठी पोलिसांनी कोपरा गावातील एकमेव कॅमेरा तपासला असता, त्यात गोळीबार झाल्याच्या वेळेत चार तरुण निदर्शनास आले. या तरुणांबाबत पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, एक दिवसापुर्वीच तेथील चाळीमध्ये चार तरुण राहण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या भागात सापळा लावून त्याठिकाणी आलेल्या दोघा तरुणांना ताब्यात घेतले. त्यांनी प्रतीकला लुटण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली.त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्या इतर दोघा साथिदारांना देखील अटक केली. तसेच त्यांनी ज्या रिव्हॉल्वर मधुन गोळीबार केला, ते रिव्हॉल्वर व जिवंत काडतूसदेखील जफ्त केले. खारघर येथे गोळीबार करुन फरार झालेल्या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितले की, गोळीबार, लुटमारी करून मिळालेल्या रक्कमेतून हॉटेल सुरू करण्याची योजना आखणार होते. महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पढार, मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार, गुहाने आदींच्या पथकाने केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply