कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेत ‘मेस्सी मॅजिक’
माद्रिद : वृत्तसंस्था
लिओनेल मेस्सीच्या अप्रतिम कामगिरीमुळे बार्सिलोनाने ग्रेनडाचे आव्हान अतिरिक्त वेळेत 5-3 असे परतवून लावत कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे. दोन मिनिटांचा खेळ शिल्लक असताना दोन गोलने पिछाडीवर असूनही मेस्सीच्या खेळीमुळे सामन्याचे चित्र पालटले.
केनेडी (33व्या मिनिटाला) आणि रॉबेटरे सोल्डाडो (47व्या मिनिटाला) यांनी ग्रेनडाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती, पण मेसीच्या गोलसाहाय्यामुळे अँटोनी ग्रिझमन (88व्या मिनिटाला) आणि जॉर्डी अल्बा (90व्या मिनिटाला) यांनी गोल करीत हा सामना अतिरिक्त वेळेत नेला. त्यानंतर ग्रिझमन (100व्या मिनिटाला), फ्रेंकी डे जाँग (108व्या मिनिटाला) आणि अल्बा (113व्या मिनिटाला) यांनी गोल करीत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला.
लिव्हरपूलचा पराभव
अॅनफिल्ड स्टेडियम या घरच्या मैदानावर प्रीमियर लीगमधील 68 सामने अपराजित राहण्याची किमया करणार्या लिव्हरपूलला ब्रायटनकडून 0-1 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. स्टीव्हन अल्झाटेने 57व्या मिनिटाला गोल करीत ब्रायटनला विजय मिळवून दिला. लिव्हरपूल 40 गुणांसह चौथ्या स्थानी घसरला आहे. मँचेस्टर सिटीने बर्नलेचा 2-0 असा पराभव करीत 47 गुणांसह अग्रस्थान कायम राखले आहे.